पनवेल : शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने व्यापारी दुकानदाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बुधवारी खारघरमधील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या विरोधात उत्सव चौकात मानवी साखळी तयार करून काळे कपडे परिधान करून लॉकडाऊनचा निषेध केला. उत्सव चौक येथील बँक ऑफ इंडिया सिग्नलजवळ शहरातील ज्वेलर्स, फर्निचर दुकान, कपडे विक्रेते, लहान फेरीवाले, खेळण्यांचे दुकानदार आदींसह मोठ्या संख्येने दुकानदार सकाळी ९ वाजता जमून दोन तास निदर्शने केली. यावेळी व्यापारी ‘जिने दो जिने दो व्यापरीयो को जिने दो’ अशा स्वरूपाच्या घोषणा देत होते. तसेच हातात ‘कोरोना पहिले खत्म होगा या व्यापारी’ अशा स्वरूपाचे बॅनर झळकवले होते.शहरातील एकता व्यापारी असोसिएशनच्या वतीने ही निदर्शन करण्यात आली. यावेळी एकता व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून सर्व व्यापाऱ्यांना पालिका प्रशासनाने कांदे-बटाटे विकण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून बंद असलेल्या दुकानातून काही तरी उपजीविकेचे साधन निर्माण होईल. शासनाने निर्बंध शिथिल न केल्यास आम्हाला रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येईल असे सांगितले. नवी मुंबईत निदर्शने केल्याप्रकरणी गुन्हे दाखलनवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांना व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहेत. नियम डावलून हे आंदोलन होत असल्याने वाशी व एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबईत मंगळवारपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात केवळ अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे. यामुळे इतर व्यापाऱ्यांना आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना महापालिका व पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र बहुतेक व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध दर्शवला आहे. त्यानुसार शासन आदेशाच्या विरोधात ठिकठिकाणी जमाव जमवून निदर्शने केली जात आहेत. त्यानुसार मंगळवारी दुपारी सीवूड सेक्टर ४० परिसरात २५ ते ३० व्यापारी रस्त्यावर जमले होते, तर बुधवारी सकाळी वाशी व कोपर खैरणे येथे व्यापाऱ्यांनी साखळी आंदोलन करून राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. मात्र राज्यात जमावबंदी व संचारबंदी असतानाही नियम डावलून निदर्शने केल्याप्रकरणी एनआरआय व वाशी पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
CoronaVirus Lockdown News: सलग दुसऱ्या दिवशीही व्यापारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:36 AM