CoronaVirus Lockdown News: खारघर शहरात दुकानदारांची निदर्शने; पनवेलमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:53 AM2021-04-07T01:53:06+5:302021-04-07T01:53:24+5:30
लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
पनवेल : शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दि. ५ रोजी रात्री उशिरा पारित केले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ब्रेक द चेन चा नारा देत दि. ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. यानुसार पालिका क्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आले असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमता अथवा फिरता येणार नाही. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजे पर्यंत वैध कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
पालिकेचा हा आदेश सोमवारी रात्री आल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी व्यापारी , दुकानदार ,लहान व्यावसायिक संभ्रमात होते. काहींनी सकाळी दुकाने सुरु केली होती. त्यानंतर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने दुकाने बंद करण्याच्या सूचना संबंधित आस्थापनांना दिल्यानंतर दुकाने बंद करण्यास सुरुवात झाली. पनवेल शहरात सकाळी दुकाने सुरु होती. मात्र ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम झाला. विशेष म्हणजे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले.
खारघर शहरात दुकाने बंद करण्याच्या सूचना करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर शेकडो व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करीत लॉकडाऊनचा विरोध केला. शहरातील सेक्टर १२ येथील नवरंग चौकात दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत लॉकडाऊनच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेकडोच्या संख्येने एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी संबंधितांवर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी गुन्हे दाखल केले आहेत. खांदा कॉलनी, कामोठे ,कळंबोली , नवीन पनवेल , तळोजा आदी ठिकाणी सकाळी सुरू करण्यात आलेली दुकाने पोलिसांच्या सूचनेने व्यापाऱ्यांनी ११ च्या दरम्यान बंद केली .अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.
शहरी भागात दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली असताना ग्रामीण भागातील दुकाने बहुतांशी सुरूच असल्याचे पहावयास मिळाले. पोलिसांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली असली तरी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी असल्याने बहुतांशी दुकानदारांनी दिवसभर दुकाने सुरूच ठेवल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळाले.