CoronaVirus Lockdown News: आजपासून दोन दिवस शहरात कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:36 AM2021-04-10T01:36:54+5:302021-04-10T01:37:06+5:30
जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच उघडी
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे शनिवार व रविवार दोन दिवस नवी मुंबईमध्येही कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर फिरता येणार नाही. हॉटेलमध्ये पार्सल आणण्यासाठीही जाता येणार नाही. परंतु हॉटेलमध्ये फोन करून घरी पार्सल मागविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नवी मुंबईमध्ये प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णालयांमध्ये जागा कमी पडू लागली आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये जागा उपलब्ध नाही. सर्वांना उपचार मिळवून देताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. कोरोना रोखण्यासाठी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहेत. परंतु अनेक नागरिक चोरून दुकाने सुरू ठेवत आहेत. अद्याप भाजी मार्केट व इतर ठिकाणी गर्दी होत आहे. यामुळे शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. मॉल्स, सलून, फर्निचर व इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ६ एप्रिलपासून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक बार व मॉल्सकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तुर्भेमधील एक बार सात दिवसांसाठी सील केला आहे. पुढील दाेन दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेणे बंद
शासनानियमाप्रमाणे हॉटेलचालकांना फक्त पार्सल देण्यास परवानगी दिली होती. परंतु शनिवार व रविवारी नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही. परंतु हॉटेलमध्ये फोन करून किंवा ऑनलाइन डिलीव्हरी देणाऱ्यांकडून घरपोच पार्सल पुरविण्यास परवानगी असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
डोळ्यांचे दवाखाने सुरू
पुढील दोन दिवस सनदी लेखापालांची कार्यालये सुरू ठेवली जाणार आहेत. याशिवाय डोळ्यांचे दवाखाने व चश्मा बनवणारी दुकानेही सुरू ठेवली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.