CoronaVirus Lockdown News: कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:39 AM2021-04-08T01:39:57+5:302021-04-08T01:40:15+5:30

दुसऱ्या दिवशी समाधानकारक प्रतिसाद; व्यापाऱ्यांमधील नाराजी कायम

CoronaVirus Lockdown News: Strict restrictions continue to be enforced | CoronaVirus Lockdown News: कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू

CoronaVirus Lockdown News: कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू

Next

नवी मुंबई : ब्रेक दि चेनअंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांची नवी मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी समाधानकारक अंमलबजावणी सुरू झाली. पोलीस व महानगरपालिका पथकाने कारवाई सुरू केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली. या निर्बंधांविषयी व्यापाऱ्यांमध्ये नाराजी कायम असून अनेकांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरूच ठेवला होता. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. प्रतिदिन एक हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णालयीन यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड मिळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिकेने कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तू वगळून इतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मंगळवारी नागरिकांना माहिती नसल्यामुळे अनेक दुकाने सुरूच ठेवण्यात आली होती. यानंतर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने प्रत्येक नोडमध्ये जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करावी लागेल, असे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. आवाहन करूनही जे ऐकत नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यामुळे बुधवारी कडक निर्बंधांची समाधानकारक अंमलबजावणी सुरू झाली आहे. हार्डवेअर, फर्निचर, स्टेशनरी व इतर अनेक दुकाने दिवसभर बंद होती. बहुतांश सलूनही बंदच होते. काही सलून व्यवसायिकांनी अर्धे शटर उघडून ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली होती. सीबीडी, नेरुळ, जुईनगर, वाशी व इतर ठिकाणीही काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू ठेवला होता. 

शहरात नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसत होती. परंतु  सायंकाळी सानपाडा, नेरुळ व इतर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी नेहमीप्रमाणे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी मनपाचे पथक कारवाई करत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर सामाजिक अंतर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसले. गर्दीचे नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जे नियम मोडतील त्यांच्यावर निष्पक्षपणे कारवाई करावी. अन्यथा निर्बंधांचा हेतू साध्य होणार नाही अशा प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करत आहेत. 

वाहनांची संख्या नियंत्रणात
कडक निर्बंध लागू केल्यानंतर शहरातील अंतर्गत रोडवर वाहतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. दुकाने बंद केल्यामुळे त्याचा परिणाम रिक्षा वाहतुकीवरही पडला असून व्यवसाय कमी झाल्याची प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी दिली. सायन-पनवेल महामार्ग व पामबीच रोडवरही नेहमीपेक्षा काही प्रमाणात वाहनांची संख्या कमी झालेली पाहावयास मिळाली.

पोलिसांकडूनही कारवाई सुरू
वारंवार आवाहन करूनही अनेक दुकानदार व्यवसाय सुरूच ठेवत आहेत. रात्री अनेक जण अद्याप समूहाने फिरत आहेत.  नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु यानंतरही न ऐकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यासही सुरुवात केली आहे. बेलापूरसह शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांना प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे. 

शहरातील कोरोनाची स्थिती 
एकूण रुग्ण    ७२४५०
सरासरी प्रतिदिन रुग्ण    १०७१
सक्रिय रुग्ण    ९६२०
कोरोनामुक्तीचे प्रमाण    ८५ टक्के 
सरासरी प्रतिदिन चाचणी    ६८६९
एकूण चाचणी    ७,२३१५९
रुग्ण दुपटीचा कालावधी    ४८ 

Web Title: CoronaVirus Lockdown News: Strict restrictions continue to be enforced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.