CoronaVirus Lockdown News: ‘गर्दीची ठिकाणे’ वगळता ‘कडकडीत बंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:19 AM2021-04-10T01:19:53+5:302021-04-10T01:20:05+5:30
फेरीवाल्यांना अभय : अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वाढले हॉटस्पॉट
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोरोना प्रसाराचा हॉट स्पॉट ठरू शकतील, अशी गर्दीची ठिकाणे दुर्लक्षित झाली आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी रस्त्यांवर अलोट गर्दी, तर लगतची दुकाने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, नवी मुंबईत गर्दीच्या ठिकाणांना सर्व काही माफ असल्याचे चित्र आहे. ज्या व्यावसायिकांकडे एकावेळी ३ ते ४ ग्राहक असतात, अशी दुकाने सक्तीने बंद केली आहेत. त्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्याच दुकानांच्या बाहेर रस्त्यावर अलोट गर्दीला कारणीभूत ठरणारे बाजार मात्र पोलीस व पालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे अशी ठिकाणे भविष्यात कोरोना प्रसाराची हॉट स्पॉट ठरू शकतात. कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ, ऐरोली, वाशी यासह इतरही विभागांत हे चित्र पाहायला मिळत आहे. या विभागांमध्ये अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यांवर बाजार भरत आहेत, तर काही ठिकाणी अद्यापही आठवडे बाजार भरवण्यास मुभा दिली जात आहे. कठोर निर्बंधांतून अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे. याचाच आधार घेत भाजी, मांस विक्रेत्यांकडून जागोजागी बाजार मांडला जात आहे. त्यापैकी नेरूळ रेल्वेस्थानकाच्या दुतर्फा भरणारा बाजार, ऐरोली सेक्टर ५ व ८ येथील बाजार, तसेच कोपरखैरणे सेक्टर १५ येथील बाजार याठिकाणची गर्दी काळजात धडकी भरवणारी आहे. मात्र, त्याठिकाणी पालिका अथवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी फिरकत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्गावर तर दिवस-रात्र फेरीवाले बस्तान मांडून बसत आहेत. ही सर्व ठिकाणे दुर्लक्षित करून इतर व्यावसायिक व नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक यांच्यावर कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम पालिका अधिकारी करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे कोरोनाचा वाढतोय प्रसार
कोरोनाला आळा घालण्यासाठी अद्यापही गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली व वाशी याठिकाणी अद्यापही रस्त्यांवर बाजार भरून मोठी गर्दी होत आहे. परिणामी, याच विभागांमध्ये प्रतिदिन शंभरहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यावरून कोरोनाच्या प्रसाराला अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत असतानाही, त्याचे खापर नागरिकांच्या माथी फोडले जात आहे.