पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने ३ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे, परंतु नागरिकांचा वावर कमी होताना दिसत नाही. बाजारपेठांत नागरिकांची गर्दी कायम असल्याने लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, आता बहुतांशी अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येणार असून, सर्वच ठिकाणचे काउंटर सेल बंद केले जाणार आहेत.सोमवारी सायंकाळी उशिरा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या संबंधित नव्याने परिपत्रक काढले असून, नव्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. नव्या परिपत्रकानुसा अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फळे, बेकरी, दूध, मासळी, चिकन, मटण आदींसह इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दिल्या जाणार आहेत. दूध आणि डेअरी आस्थापनांना सकाळी ५ ते सकाळी १० दरम्यानच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. औषधांच्या दुकानांना सोशल डिस्टन्सिंग पाळून सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत औषधांची विक्री करता येणार आहे. रुग्णालयातील २४ तास औषधे विक्री करण्याची मुभा असलेल्या दुकानांचा सेवा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे. पिठाची गिरणी सकाळी ९ ते सांय. ५ पर्यंत सुरू ठेवता येणार आहे.हॉटेल व रेस्टॉरंटना सकाळी १० ते रात्री १० पर्यंत घरपोच (पार्सल) सेवा पुरविता येणार आहे. वारंवार अवाहन करूनही मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणखी कठोर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या संदर्भात उपमहापौर जगदीश गायकवाड यांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये गायकवाड यांनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करीत लॉकडाऊनसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.लॉकडाऊनमध्ये कठोरता आणण्याचा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोविडची साखळी तोडण्यास मदत करणे अपेक्षित आहे.- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिकापालिका प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये आणखी कठोरता आणली आहे. आयुक्तांचा हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच असल्याने शहरवासीयांनी महापालिकेला सहकार्य करावे.- जगदीश गायकवाड, उपमहापौर, पनवेल महानगरपालिका
coronavirus: पनवेलमध्ये लॉकडाऊनचे नियम झाले अधिक कडक, अत्यावश्यक सेवा आता घरपोच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 12:57 AM