coronavirus: मॉल्स, चित्रपटगृह, व्यावसायिकांना सलग तिसरे उल्लंघन पडणार महाग, महानगरपालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:37 AM2021-04-03T03:37:55+5:302021-04-03T03:38:25+5:30
Coronavirus: मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, चित्रपटगृहे, मंगल कार्यालय चालकांना यापुढे नियमांचे उल्लंघन महाग पडणार आहे.
नवी मुंबई : मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, चित्रपटगृहे, मंगल कार्यालय चालकांना यापुढे नियमांचे उल्लंघन महाग पडणार आहे. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास सात दिवस मॉल्स व स्टोअर्स बंद केली जाणार असून, तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास कोरोना संपेपर्यंत बंदी घालण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये सर्वाधिक गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, चित्रपटगृहे, उपाहारगृहे, बार, मंगल कार्यालये, सभागृह, बँक्वेट हॉल्स यांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक आस्थापनाचालक नियमांचे पालन करीत नाहीत. यामुळे यापुढे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी शुक्रवारी कारवाईविषयी त्रिसूत्री जाहीर केली आहे. शहरातील सर्व मॉल्स, हॉटेल, बार यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. मास्क घातल्याशिवाय प्रवेश देऊ नयेे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. शुक्रवारी सायंकाळी व शनिवार, रविवारी मॉल्समध्ये कोरोना चाचणी केल्याशिवाय परवानगी देेऊ नये. हॉटेल व इतर ठिकाणी क्षमतेपेक्षा ५० टक्केच ग्राहकांना परवानगी द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार आहे.
पालिकेने शहरातील दोन मॉल्स व अनेक हॉटेल्सकडून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ५० हजारांचा दंड आकारला. हा दंड आकारल्यानंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मॉल्स, हॉटेल, मंगल कार्यालये, डिपार्टमेंट स्टोअर्स सात दिवस बंद करण्यात येणार आहेत. यानंतरही तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले तर कोरोना संपेपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कारवाईसाठी विशेष पथकांची नियुक्ती
शहरात कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्येक विभागात पोलीस व मनपा कर्मचारी यांची पथके तैनात केली आहेत. याशिवाय परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथकेही तयार केली आहेत. मनपा आयुक्त अभिजित बांगर हेही अचानक मॉल्स व इतर ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आहेत. कोठेही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मॉल्स, हॉटेल व व्यावसायिकांसाठी सुधारित नियमावली
योग्य प्रकारे मास्क घातल्याशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश देऊ नये.
मॉल्समध्ये शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी - रविवारी कोरोना चाचणी केलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा.
प्रवेशद्वारावर व आवश्यक त्या ठिकाणी हॅण्ड सॅनेटायझर उपलब्ध करून द्यावे.
सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
प्रवेशद्वारावर तापमान तपासावे व ताप असणारांना प्रवेश देऊ नये.
nहॉटेल, बार, चित्रपटगृहांमध्ये ५० टक्केपर्यंतच उपस्थिती राहील याकडे लक्ष द्यावे.
nलग्न समारंभात ५० पेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देऊ नये.