Coronavirus: माथाडी कामगारांनी 10 एप्रिलपासून कामावर येऊ नये; मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 09:29 PM2020-04-08T21:29:04+5:302020-04-08T21:29:34+5:30
10 एप्रिलपासून बाजार समिती बंद ठेवण्याचे व माथाडी कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन कामगार नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 10 एप्रिलपासून बाजार समिती बंद ठेवण्याचे व माथाडी कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन कामगार नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. माथाडी कामगार व व्यापारी संघटनांनी ही शासनास सहकार्याची भूमिका घेतली होती. परंतु बुधवारी मसाला मार्केटमधील व्यापा-यास कोरोनाची लागण झाल्यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. येथील धान्य, मसाला, कांदा, भाजी व फळ या पाचही मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी शुक्रवार 10 एप्रिलपासून बाजार समितीची सर्व मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन शासनास केले आहे. माथाडी कामगारांनी ही स्वतःच्या सुरक्षेसाठी कामावर येऊ नये. घरीच थांबावे असे आवाहन केले आहे. बाजार समितीचे भाजीपाला मार्केट गुरुवारी सुरू राहणार आहे. शुक्रवारपासून सर्व मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.