CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन; १०० जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:42 PM2021-04-29T23:42:13+5:302021-04-29T23:42:22+5:30

प्रत्येक रुग्णावर लक्ष : १०० जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग

CoronaVirus: micro-planning for corona control; Regular online meetings of 100 people | CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन; १०० जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग

CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन; १०० जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग

Next

नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नवी मुंबई सावरू लागली आहे. रुग्ण वाढ नियंत्रणात आली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. घातक ठरलेली लाट थोपविण्यासाठी मनपाने सूक्ष्म नियोजन व सर्वेक्षणावर भर दिला आहे. 

प्रत्येक सेक्टर व इमारतनिहाय रुग्णांची नोंद ठेवली जात आहे. आयुक्त अभिजित बांगर प्रतिदिन सायंकाळी तीन तास आढावा बैठक घेत असून त्यामध्ये सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, विभाग अधिकारी, नोडल अधिकारी मिळून जवळपास १०० जणांचा समावेश असून त्यांच्याकडून दिवसभरातील आढावा व दुसऱ्या दिवसाचे नियोजन केले जात आहे.

नवी मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. मनपाने फक्त वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्र सुरू ठेवले होते. शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्रांचा परिसर कोरोनामुक्त झाला होता; परंतु मार्चपासून रुग्ण झपाट्याने वाढू लागले व आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. त्यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णालयीन सुविधा वाढविण्याबरोबर प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म सर्वेक्षण करून नियोजन करण्यास सुरुवात केली.

रुग्णांचा आरोग्य केंद्रनिहाय आढावा ठेवला जातो. याशिवाय प्रत्येक सेक्टर, प्रत्येक इमारतनिहाय वस्तुस्थितीदर्शक आकडेवारीसह अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अहवालामुळे कोणत्या इमारतीमध्ये, कोणत्या सेक्टरमध्ये व कोणत्या नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात रुग्ण वाढत आहेत. कोणत्या वयोगटातील रुग्ण वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाण काेठे व कोणत्या वयोगटातील जास्त आहे याची दैनंदिन आकडेवारी तयार करून त्यावर अभ्यास करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय उपचार सुरू असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले. विभाग अधिकारी व प्रत्येक विभाग कार्यालयासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आला. डॉक्टर्स व अधिकारी यांची जवळपास १०० जणांची मुख्य टीम तयार झाली आहे. या सर्व डॉक्टर्स व अधिकारी यांच्यासोबत सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा अशी तीन तास बैठक घेतली जात आहे. दिवसभरातील कामाचा आढावा. कुठे समाधानकारक काम सुरू आहे. कुठे उणिवा राहत आहेत. ठरविलेले काम झाले का, या सर्वांविषयी आढावा घेऊन दुसऱ्या दिवसाचे नियोजन करणे, अशा प्रकारे कामकाज केले जात आहे. 
 

Web Title: CoronaVirus: micro-planning for corona control; Regular online meetings of 100 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.