coronavirus: नवी मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी दिशाभूल करणारी, पाच जणांचीही होत नाही चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:24 AM2021-04-01T03:24:22+5:302021-04-01T03:25:28+5:30
coronavirus: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगविषयी आकडेवारी दिशाभूल करणारी ठरत असून, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमध्ये प्रतिदिन ६०० ते ७०० जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी व विषाणू प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला विशेष महत्त्व आहे. पालिका कार्यक्षेत्रात रुग्णाच्या संपर्कातील किमान २५ जणांची चाचणी केली जात असून, हे प्रमाण ३० वर घेऊन जाण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याचे कागदावर भासविले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच व्यक्तींचाही शोध घेतला जात नाही. अनेक रुग्णांना त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाच्या संपर्कात आले आहेत, हे विचारलेही जात नाही. काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी विचारतात; परंतु रुग्ण माहिती देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. संपर्कातील व्यक्तींची माहिती दिली जात नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.