CoronaVirus मुंबईतील वाढत्या रुग्णांची धास्ती; मुंबई भाजीपाला मार्केटमधील आवक घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:11 PM2020-05-02T16:11:01+5:302020-05-02T16:12:36+5:30
मुंबई व नवी मुंबई मधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी शासनाने एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरू ठेवली आहेत.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून आवक घटली आहे. शनिवारी भाजीपाला मार्केट मध्ये फक्त 40 वाहनेच आली आहेत.
मुंबई व नवी मुंबई मधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी शासनाने एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरू ठेवली आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून मार्केट मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 1 मे पर्यंत पाच मार्केटमध्ये 26 रूग्ण आढळले आहेत. मार्केट मधील रूग्णांमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाली असून एपीएमसी मार्केट बाहेरील फळ विक्रेत्यालाही लागण झाली आहे. यामुळे व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजीपाला मार्केट मध्ये दोन दिवसापासून आवक घटली आहे. शुक्रवारी 95 ट्रक व टेंपोतून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. शनिवारी फक्त 40 वाहनांचीच आवक झाली आहे. सुरक्षेसाठी घरातच थांबा असे आवाहन व्यापारी संघटनेने यापुर्वी केले आहे. यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे.
फळ व धान्य मार्केट मध्ये आवक समाधानकारक होत आहे. परंतु मसाला व कांदा बटाटा मार्केट मध्ये ही आवक घटली आहे. एपीएमसी मधील रूग्णांची संख्या वाढत राहिली तर आवक अजून कमी होण्याची शक्यता आहे.
शनिवार मार्केट निहाय वाहनांची आवक
मार्केट आली
भाजी 40
कांदा- बटाटा 68
मसाला 68
फळ 326
धान्य 300