Coronavirus : मुंबई-ठाण्याने वाढवली नवी मुंबईची चिंता, तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:32 AM2021-04-01T01:32:05+5:302021-04-01T01:33:14+5:30
Coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुंबई शेजारील शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, नागरिकांना सुरक्षा नियमांचा विसर पडल्याने नवी मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, पुन्हा एकदा शहराची चिंता वाढली आहे.
नवी मुंबईत गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, बाधितांची संख्या रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची निर्मिती केली आहे. परंतु शहरात कामानिमित्त येणारे तसेच शहरातून कामानिमित्त इतर ठिकाणी जाणारे नागरिक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, आदी बाबी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ, विविध आयटी कंपन्या, आदी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे कामानिमित्त मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील अनेक ठिकाणचे नागरिक दररोज नवी मुंबई शहरात येतात. तसेच कामानिमित्त शहरातील नागरिक इतर शहरांमध्ये जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून, नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. कामानिमित्त ये-जा करण्यासाठी बेस्ट बस, एनएमएमटी, एसटी, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, आदी प्रवासी वाहनांचा वापर केला जात असून, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून नागरिकांची होणारी गर्दी, सुरक्षा नियमांचा पडलेला विसर यामुळेच रुग्णसंख्येत भर पडली
आहे.
बाहेरून आलेल्यांची चाचणी नाही
नवी मुंबई शहरात शेजारील इतर शहरांतून तसेच राज्यातील विविध भागांतून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करतात.
शहरातील प्रमुख बस स्टॉपवर कोविड चाचणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
शहरातील काही रेल्वे स्थानकांवर महापालिकेच्या माध्यमातून कोविड चाचण्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी चाचणी करण्याची प्रवाशांना किंवा नागरिकांना कोणतीही सक्ती करण्यात येत नाही.
एपीएमसी बाजरपेठेत दररोज लाखो नागरिक ये-जा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोविड टेस्ट सेंटरदेखील उभारण्यात आले आहे; परंतु या ठिकाणी देखील चाचणी करण्याची सक्ती नसल्याने अनेक नागरिक चाचणी न करताच ये-जा करतात.