Coronavirus: खासगी रुग्णालयातील बिलांवर पालिकेचे नियंत्रण; चार सदस्यीय समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:26 AM2020-07-01T00:26:02+5:302020-07-01T00:26:13+5:30
खासगी रुग्णालयातील शुल्क आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी दरपत्रक केलेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का, याच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.
नवी मुंबई : खासगी रुग्णालयातील मनमानी पद्धतीने बिल आकारण्यावर आता महानगरपालिका नियंत्रण ठेवणार आहे. बिल आकारणीसह महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीकरिता चार सदस्यीय समिती गठीत केली असून, ही समिती आयुक्तांना नियमित अहवाल देणार आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून काही खासगी रुग्णालयांनी मनमानी पद्धतीने बिल आकारणी करण्यास सुरुवात केली. काही रुग्णांना ५ लाखांपेक्षा जास्त बिल आकारल्याचे समोर आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही पैशासाठी आग्रह धरला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. महानगरपालिकेने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे, अशा सूचना देऊनही अनेकांनी नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवले होते. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही खासगी रुग्णालयांच्या मनमानीविषयी आवाज उठविला होता. मनसेने आयुक्तांकडे पाठपुरावा करून तीन रुग्णांचे बिल कमी करण्यास भाग पाडले होते. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनीही याविषयी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना पत्र दिले होते.
या सर्वांची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी चार जणांची समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले या समितीच्या अध्यक्षा असणार आहेत. वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनावणे, आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, अधीक्षक उत्तम खरात हे समितीचे सदस्य असणार आहेत.
खासगी रुग्णालयातील शुल्क आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी दरपत्रक केलेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का, याच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. शुल्क आकारणी किंवा महात्मा फुले योजनेविषयी तक्रारी असल्यास या समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.