Coronavirus: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम; तीन लाखांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:18 AM2020-10-13T00:18:44+5:302020-10-13T00:19:07+5:30
१० लाख ५३ हजार नागरिकांची तपासणी
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु वातीपासूनच आघाडी घेत राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या ३ लाख १६ हजार ४४९ कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त राज्यात सर्वाधिक चांगले काम केलेले आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिकेने ३ लाख ३५ हजार ४६९ कुटुंबांमधील १० लाख ५३ हजार ८९६ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही कामगिरी राज्यात सर्वोत्तम आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकात दोन ते तीन कोरोनादूतांचा समावेश असलेली ६७० पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान तसेच आॅक्सिजन पातळी तपासून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय? याची माहिती नोंदवित आहेत. तसेच कोणत्या व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी आहेत काय? याबाबतचीही माहिती संकलित केली जात आहे.
यासोबतच घरातील सर्व नागरिकांना कोरोनापासून बचावाची तंत्रे सांगितली जात असून, त्यामध्ये प्रामुख्याने नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, एखादा कोरोनाबाधित बरा झाला असल्यास इतरांच्या आरोग्य हितासाठी त्यांना प्लाझ्मा डोनेशनसाठी प्रोत्साहित करणे अशी विविध प्रकारची माहिती देत व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे.
मिशन ब्रेक द चेन म्हणजे जलद रुग्णशोध
पहिल्या टप्प्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पाही राबविला जाणार असून या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि आॅक्सिजन सॅच्युरेशन दुसऱ्यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्या वेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणातून संकलित होणाºया माहितीच्या आधारे लक्षणे आढळणाºया नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.याद्वारे ‘मिशन ब्रेक द चेन’ची त्रिसूत्री म्हणजे जलद रूग्णशोध व त्यांची तपासणी होऊन त्वरित उपचार सुरू झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत होत आहे.
आयुक्तांचे नागरिकांना आवाहन : नवी मुंबईकर नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेलाही चांगले सहकार्य केले. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची राज्यात सर्वोत्तम कामगिरी आपण करू शकलो त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या मोहिमेच्या १४ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया दुसºया टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणालाही नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे या तीन गोष्टींची नियमित सवय लावून आपल्यामुळे आपल्या प्रिय कुटुंबीयांना व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.