नवी मुंबई : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यासाठी वाशी व पनवेलमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीला दोन्ही ठिकाणी एकूण ७२० हून अधिक जण क्वारंटाइन केंद्रात आहेत. त्यांच्या अन्नपाण्याच्या सुविधेसह आरोग्याची पुरेपूर काळजी प्रशासन घेत आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित व संशयितांवर उपचारासाठी पालिकेने वाशी व पनवेल येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. त्यानुसार वाशी सेक्टर १४ येथे ८७ जण तर पनवेलच्या इंडिया बुल्समध्ये ६३३ जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या आवश्यक सोयी व सुविधांची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. तर इंडिया बुल्स येथील संपूर्ण यंत्रणा हाताळण्यासाठी निवासी अधिकारी म्हणून महेंद्र सप्रे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
इंडिया बुल्सच्या पाच इमारतींपैकी एक इमारत पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तर एक संशयित रुग्णांसाठी वापरली जात आहे. शिवाय परिसराची स्वच्छता करणारे, रुग्णांच्या सेवेसाठी नेमलेले, सुरक्षारक्षक यांच्या निवासाची व औषधांच्या साठ्यासाठी स्वतंत्र इमारत वापरली जात आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे. याकरिता नियमित तपासणीवेळी वैद्यकीय पथकाकडून प्रथम संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना हाताळले जात आहे. इतरांना संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
वाशीत पॉझिटिव्ह रुग्णांसाठी व संशयितांसाठी स्वतंत्र मजला आहे. दोन्ही कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन असलेल्यांना पौष्टिक अन्न देऊन प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नात शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा समावेश असून अल्पोपाहारामध्येही दूध व अंड्याचा समावेश आहे. त्याकरिता कम्युनिटी किचनचा आधार घेतला जात आहे.इंडिया बुल्स येथील क्वारंटाइन व्यक्तींना परिसरातीलच हॉटेलमधून जेवण पुरवले जात आहे. इंडिया बुल्स येथे प्रत्येक क्वारंटाइन व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली आहे. त्यामध्ये बेड, पंख्यासह आवश्यक सुविधा आहे.लाखो स्थलांतरित कामगारपनवेल : पनवेल परिसरात एक लाख ७५ हजार स्थलांतरित कामगार राहत असल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी स्पष्ट केले आहे. यात बांधकाम साइट, एमआयडीसी, उद्योग-व्यवसायातील कामगार तसेच नाका कामगारांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला पोलिसांकडे ९००० कामगारांची नोंद करण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून कर्नाळा स्पोटर््स अकादमी, तालुका क्रीडा संकुल, व्ही.के. हायस्कूल, कालभैरव मंगल कार्यालय, कळंबोली या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ३००० क्षमतेच्या या निवारा केंद्रात शेकडो कामगार सध्याच्या घडीला थांबले आहेत. पालिकेव्यतिरिक्त पनवेल शहरात भाजपने मोदी भोजन हा उपक्रम सुरू केला आहे. दररोज शेकडो मजुरांना मोफत जेवण दिले जाते. याकरिता शहरात कम्युनिटी किचन उभारण्यात आले आहे. आतापर्यंत ३८ हजार मजुरांना उपक्रमांतर्गत भोजन देण्यात आले असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली.