coronavirus : कोरोनाग्रस्त महिलेने दिला मुलीला जन्म; महापालिकेचे डॉक्टर बनले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 11:33 PM2020-04-06T23:33:52+5:302020-04-06T23:35:57+5:30
या कोरोनाग्रस्त महिलेने मुलीला जन्म दिला असून सोमवारी ६ रोजी दुपारी प्रसूत झाली. दोन दिवसापूर्वी या गरोदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.
- अनंत पाटील
नवी मुंबई – कोरोनाचा संसर्ग झालेल्या घणसोली येथील गरोदर ३४ वर्षीय महिलेची सध्या लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत बाळाला जन्म दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात सिझेरियन प्रसूती करण्यात येथील प्रसिद्ध डॉ.राजेश म्हात्रे यांच्या टीमला यश आले आहे. या कोरोनाग्रस्त महिलेने मुलीला जन्म दिला असून सोमवारी ६ रोजी दुपारी प्रसूत झाली. दोन दिवसापूर्वी या गरोदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.
घणसोली घरोंदा येथे राहत असलेल्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेला रविवारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार ती राहत असलेली संपूर्ण इमारत सील करण्यात आली होती. ती गरोदर असल्यामुळे तिला अधिक वेदना जाणवू लागल्याने रविवारी सकाळी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र तिथे खाटांची उपलब्धता नसल्यामुळे रविवारी ५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले.
पहिल्या बाळंतपणात तिची सिझेरियन प्रसूती झाली होती. आता पण तिची सिझेरियन प्रसूती करणे आवश्यक होते. त्यामुळे महापालिकेचे स्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर टीमने सिझेरियन करून यशस्वी प्रसूती केली. महाराष्ट्रातील बहुधा अशी पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते. सध्या बाळ बाळंतीण सुखरूप असून कोरोनाग्रस्त महिलेला महापालिकेच्या कोरोना आयसोलेशन विभागात तर बाळाला तिचा संसर्ग होऊ नये म्हणून एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.