नवी मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या दहा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सात दिवसांच्या कालावधीत या गावांमध्ये अत्यावश्यक सुविधेचा भाग वगळून इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याकरिता पोलिसांचा पुरेसा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.
२९ जून ते ५ जुलैपर्यंत लॉकडाऊन पाळला जाणार आहे. या कालावधीत पालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक या दहाही गावांमधील घरोघरी जाऊन कोविड चाचणी करणार आहे. या दरम्यान गावांमधील कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय आत किंवा बाहेर जाण्याची मुभा दिली जाणार नाही. त्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
या दरम्यान पालिकेचे वैद्यकीय पथक, अत्यावश्यक सेवेचा भाग यांनाच गावात प्रवेश दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती अथवा वाहनाला गावामध्ये किंवा गावाबाहेर जाण्याची मुभा दिली जाणार नाही. पोलिसांच्या परवानगीविना फिरताना कोणी आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नवी मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मागील तीन महिन्यांत पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या सहा हजारांच्या घरात पोहोचली आहे, तर २०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात गावठाण भागातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेकडून मास स्क्रीनिंगची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, पालिकेने सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या दहा गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्यामुळे येथे कडक अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेतर्फे १० प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्यानुसार, २९ जून ते ५ जुलैदरम्यान सर्व प्रतिबंधित क्षेत्राभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. - पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १.