Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:59 PM2020-08-26T23:59:43+5:302020-08-26T23:59:57+5:30

मुंबईबाहेरील सर्वात मोठी प्रयोगशाळा : चोवीस तास तपासण्यांचे काम सुरू

Coronavirus: Navi Mumbai Municipal Corporation's laboratory completes the phase of ten thousand tests | Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

googlenewsNext

नामदेव मोरे 

नवी मुंबई : एमएमआरडीए परिसरात मुंबईबाहेरील सर्वात मोठी कोरोना चाचणी प्रयोगशाळा नवी मुंबईत सुरू करण्यात आली आहे. २४ तास तपासण्यांचे काम सुरू असून, आतापर्यंत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. महानगरपालिकेने स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केल्यामुळे, चाचण्यांसाठी होणारा विलंब थांबला आहे. वेळेत उपचार होत असल्यामुळे मृत्युदर नियंत्रणात आणणेही शक्य झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने नेरुळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा ४ आॅगस्टला सुरू केली आहे. प्रतिदिन एक हजार चाचण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळेत आहे. मुंबई बाहेर एमएमआरडीए परिसरात एवढी क्षमता असलेली दुसरी प्रयोगशाळा नाही. वीस दिवसांत येथे दहा हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. ही प्रयोगशाळा सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेला शासनाने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीसाठी पाठवावा लागत होता. या चाचण्यांसाठी खूपच वेळ लागत होता. पाच ते दहा दिवस काही रुग्णांचे अहवाल १५ दिवसांनंतर मिळाले होते. काही रुग्णांचा अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाला होता. अभिजीत बांगर यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यासाठी आवश्यक आयसीएमआर ची परवानगी मिळवण्यात आली. प्रयोगशाळेसाठी नेरुळ रुग्णालयात जागा निश्चित करण्यात आली. दर्जेदार साहित्य खरेदी व कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली. ११ दिवसांत प्रयोगशाळेची निर्मिती करून ती प्रत्यक्षात सुरू करण्यात आली.

महानगरपालिकेच्या आरटीपीसीआर लॅबमध्ये ४ मायक्रोबायोलॉजिस्ट, २0 तंत्रज्ञ व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. चोवीस तास लॅब सुरू ठेवण्यात आली येत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ८00 ते ८५0 चाचण्या केल्या जात आहेत. २४ तासांत अहवाल उपलब्ध करून दिला जात असल्यामुळे, रुग्णावर तत्काळ उपचार सुरू करणे शक्य होऊ लागले आहे. यामुळे प्रलंबित अहवालांचे प्रमाण कमी झाले आहे. विलंब थांबल्याने रुग्ण लवकर बरा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६0 वरून ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्यूचे प्रमाण ३.५ वरून २.२५ टक्के इतके झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही या प्रयोगशाळेचा लेप्टोस्पायरसेस, स्वाइन फ्लू व एचआयव्ही चाचण्यांसाठी उपयोग होणार आहे.

ब्रेक द चेन मोहिमेस चालना
नवी मुंबई महानगरपालिकेने मिशन ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीची व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची अँटिजेन चाचणी केली जात आहे. अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली, परंतु संबंधित व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत असल्यास तत्काळ आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. यामुळेच मागील काही दिवसांत रुग्णवाढीचा दर कमी होऊ लागला आहे. मनपाच्या प्रयोगशाळेचा यामध्ये मोठा वाटा आहे.

खासगी प्रयोगशाळांकडून होणारी लूट थांबली
नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा नसल्याने स्वॅब तपासणीसाठी मुंबईमधील शासननियुक्त लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. तेथे इतर मनपातील स्वॅबही येत असल्याने, ५ ते १0 दिवस अहवाल मिळत नव्हता. यामुळे नागरिक खासगी लॅबमधून तपासणी करून घेत. सुरुवातीला यासाठी २,८00 रुपये व नंतर काही ठिकाणी ५ ते ७ हजार रुपये वसूल केले जात होते. मनपाने ही सुविधा मोफत सुरू केल्यामुळे नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबली आहे.

Web Title: Coronavirus: Navi Mumbai Municipal Corporation's laboratory completes the phase of ten thousand tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.