coronavirus: नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये तरुणांनाच सर्वाधिक लागण, खबरदारी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:34 AM2020-05-13T01:34:04+5:302020-05-13T01:37:35+5:30
कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य घबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनाने एक हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे. नवी मुंबई महापालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचे ५०% रुग्ण २० ते ४० वयोगटातील असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य घबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्यांच्या परिसरात ११ मेपर्यंत १०७८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी परिमंडळ एकमध्ये ७९७ व परिमंडळ दोनमध्ये २८१ रुग्णांचा समावेश आहे. कोपरखैरणे पोलीस ठाणे परिसरात सर्वाधिक १६९ रुग्ण आढळले आहेत. कोपरखैरणेसह वाशी, रबाळे व नेरूळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे.
तरुणांमध्ये लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. २० ते ४० वयोगटातील ५१२ जणांना प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा वर्षापर्यंतच्या ६७ जणांना याची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ५० ते ६० वयोगटातील १४ जणांचा समावेश आहे.
नवी मुंबई, पनवेल परिसरात अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी व इतर नागरिकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे जवळपास २०० पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. मुंबईमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी जाणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, बेस्टचे चालक, भाजी व ग्रोसरी दुकानदार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आल्याने इतरांना प्रादुर्भाव झाला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य खबरदारी घेतली तर कोरोनापासून स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव करणे शक्य आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणाशीही जास्त संपर्क ठेवू नये. स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महापालिका, रायगड जिल्हा प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत आहे. नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी २४ तास कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनीही योग्य काळजी घेतल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल.
- संजय कुमार,
पोलीस आयुक्त,
नवी मुंबई
कोपरखैरणे १६९
रबाळे १२२
नेरूळ ११६
वाशी १०३
एपीएमसी ७६
रबाळे एमआयडीसी ४०
सानपाडा ४८
तुर्भे ४४
सीबीडी ३
एनआरआय ४९
पनवेल ३०
पनवेल तालुका ३
कळंबोली २९