नवी मुंबई - कोरोनामुळे लागू असलेल्या संचारबंदी व लॉकडाऊन च्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. त्याकरिता 5 पथके तयार कारण्यात आली असून त्यांच्याकडून 865 ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
शहरात लॉकडाऊन असल्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे आयुक्तालय कार्यक्षेत्रातील 865 ज्येष्ठ नागरिकांची माहिती मिळवण्यात आली आहे. एकाकी राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांसोबत पोलीस नियमित सुसंवाद साधत आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसह काही अडचणी आहेत का याबाबत विचारपूस केली जात आहे.
त्याशिवाय ज्यांना अन्न पाण्याची गैरसोय निर्माण झालेली असेल त्यांनाही वेळेवर अन्न पुरवले जात आहे. तर आपत्कालीन प्रसंगी पोलिसांची मदत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हाट्सअप नंबर देखील कार्यरत करण्यात आला आहे. त्यानुसार अडचणीच्या प्रसंगी 8424820665 व 02227574928 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीसांनी केले आहे