Coronavirus Navi Mumbai updates: गर्दीमुळे नवी मुंबईसह पनवेलमध्ये कोरोनाचा स्फोट; बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:23 AM2021-03-28T02:23:25+5:302021-03-28T02:23:42+5:30
रेल्वेसह बाजारपेठांमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर : कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आव्हान
नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आहे. बाजार समितीच्या सचिवांसह प्रमुख व्यापारी व संचालकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रेल्वे, भाजी मंडई, कामगार नाके व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यामुळे शहरात कोरोनाचा स्फोट झाला असून अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसांमध्ये रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात धुवा व मास्कचा वापर करा, असे आवाहन नवी मुुंबई व पनवेल महानगरपालिका प्रशासन करत आहे. परंतु या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. मुंबई बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन जवळपास १ लाख नागरिकांची ये - जा सुरु आहे. भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. बाजार समितीमुळे शहरात इतर भागांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पनवेल बाजार समितीमध्येही सकाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नियमांचे पालन होेत नाही. यामुळे दोन्ही बाजार समित्या कोरोना प्रसाराचे केंद्र झाल्या आहेत.
तर, रेल्वेतील गर्दीमुळेही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरू केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे. नवी मुंबई व पनवेलमधील कामगार नाक्यांवरही गर्दी वाढत आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये १ मार्चपासून तब्बल १२ हजार जणांना कोरोना झाला आहे. नवी मुंबईमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० जणांना व पनवेलमध्ये सरासर ३५० जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनावाढीचा हा वेग असाच राहिला तर पुढील एक महिन्यात रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने बंद केलेली दोन उपचार केंद्र पुन्हा सुरू केली आहेत. अशीच स्थिती राहिली तर सर्वांना उपचार मिळवून देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर भांडण
मुंबई बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये नियम तोडणारांवर सुरक्षारक्षक कारवाई करत आहेत. परंतु नियम तोडणारे काही जण सुरक्षारक्षकांना मारहाण व शिवीगाळ करत आहेत. सुरक्षारक्षकांनाच संरक्षण देण्याची वेळ आली आहे. कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी वाद घालणारांवर पोलिसांनीही कडक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा बाजार समितीमध्ये शिस्त लावणे अवघड होणार आहे.
संचालकांसह सचिवांनाही कोरोना
मुंबई बाजार समितीच्या एका संचालकांना व अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बाजार समिती सचिवांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे आता तरी बाजार समितीमध्ये कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.