Coronavirus Navi Mumbai Updates: नवी मुंबईमधील मॉल्समध्ये शुकशुकाट; ५० टक्के उपस्थिती घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:08 AM2021-03-27T01:08:35+5:302021-03-27T01:08:46+5:30

कोरोना चाचणी करणाऱ्यांनाच मॉल्समध्ये प्रवेश

Coronavirus Navi Mumbai Updates: Dryness in malls in Navi Mumbai; Attendance dropped by 50 percent | Coronavirus Navi Mumbai Updates: नवी मुंबईमधील मॉल्समध्ये शुकशुकाट; ५० टक्के उपस्थिती घटली

Coronavirus Navi Mumbai Updates: नवी मुंबईमधील मॉल्समध्ये शुकशुकाट; ५० टक्के उपस्थिती घटली

Next

योगेश पिंगळे, अनंत पाटील

नवी मुंबई : शुक्रवारी सायंकाळी ते रविवारपर्यंत मॉल्समध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. यामुळे नवी मुंबईमधील सर्व मॉल्समधील उपस्थिती कमी झाली आहे. अनेक मॉल्समध्ये दिवसभर शुकशुकाट असल्याचे जाणवत होते. अनेक ठिकाणी ५० टक्केपेक्षा कमी उपस्थिती असल्याचेही निदर्शनास आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांमध्येही वाढ केली आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल ६८१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने कडक उपाययोजना सुरू केल्या असून, गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहराती सर्वात जास्त गर्दी मॉल्समध्ये होत असते. वाशीमधील इनऑर्बिट, रघुलीला सेंट्रल मॉल्सहस सीवूडमधील ग्रॅण्ड सेंट्रल यांच्यासह डी-मार्ट, रिलायन्स व इतर डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सर्व मॉल्समध्ये मिळून प्रतिदिन एक लाखपेक्षा जास्त नागरिक खरेदीसाठी जात असतात. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने मॉल्समध्ये गर्दी झाल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय तीन वेळा दंड आकारण्यात आल्यास मॉल्स बंद करण्याचा इशाराही दिला आहे. मॉल्समध्ये शुक्रवारी सायंकाळी व शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे या तीन दिवसांमध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून मॉल्सच्या प्रवेशद्वारांवर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. कोरोना चाचणी होणार असल्यामुळे अनेक नागरिक मॉल्सकडे फिरकलेच नाहीत. ५० टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती मॉल्समध्ये जाणवत होती. फूड कोर्ट व इतर स्टोअर्समध्येही दिवसभर शुकशुकाट असल्याचे जाणवत होते. ५० टक्केही उपस्थिती नसल्याची माहिती मॉल्स व्यवस्थापनांनी दिली. महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे आम्ही काटेकोरपणे पालन करत असल्याची माहिती व्यवस्थापनांनी दिली. मॉल्समध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. गतवर्षी लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मॉल्स बंद हाेते. यामुळे व्यवसायाचे नुकसान झाले. आता पुन्हा ग्राहकांची उपस्थिती रोडावली असून, त्यामुळे  पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही मॉल्स व्यवस्थापनाने सांगितले. नियमांचे पालन करण्यास तयार आहोत; पण फक्त चाचणीची सक्ती करणे योग्य नाही, असेही अनेकांनी सांगितले. 

सीवूडमध्ये चार ठिकाणी चाचणी
सीवूडमधील ग्रॅण्ड सेंट्रल मॉल्समध्ये ४ वाजल्यापासून ४ ठिकाणी कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्राहकांची गर्दी होणार नाही व त्यांची गैरसोयही होणार नाही याची काळजी घेतली जात होती.   कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे ५० टक्के उपस्थिती घटली असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. महानगरपालिकेने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू असल्याचेही स्पष्ट केले. 

वाशीत रघुलीला मॉलमध्ये ग्राहकांनी प्रवेश टाळला
वाशी रेल्वे स्टेशनसमोरील रघुलीला मॉल्सच्या  प्रवेशद्वारावरही कोरोना चाचणी करण्यात येत होती. येणाऱ्या प्रत्येकाला चाचणी करावी लागत असल्यामुळे काही ग्राहक मॉल्समध्ये प्रवेश न करताच माघारी जात असल्याचे निदर्शनास आले. मॉल्समध्येही ग्राहकांची संख्या कमी असल्याचे पहावयास मिळाले. गतवर्षी सहा महिने मॉल्स बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुन्हा ग्राहकांनी पाठ फिरविल्यास मोठे नुकसान हाेण्याची शक्यता काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

ग्राहकांची संख्या रोडावली
वाशीमधील इनऑर्बिट मॉलमध्ये लॉकडाऊन पूर्वी प्रतिदिन जवळपास १५ हजार नागरिक भेट देत होते. या आठवड्यात ग्राहकांची  उपस्थिती रोडावली आहे. कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे ५० टक्केपेक्षा कमी उपस्थिती आहे. माॅल्समध्ये शुकशुकाट असल्याचे जाणवत होते. प्रत्येक स्टोअर्समध्ये तुरळक ग्राहक असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Web Title: Coronavirus Navi Mumbai Updates: Dryness in malls in Navi Mumbai; Attendance dropped by 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.