नवी मुंबई : कोरोनाच्या महामारी संकटामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांचेदेखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील निवासी आणि अनिवासी लघू उद्योजकांचे जानेवारी ते मार्च महिन्याचे मालमत्ता देयक वितरित ना करता सूट देण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचे रोजगार बंद असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जानेवारी ते मार्च २०२० चे मालमत्ता कराचे देयक वितरित केले जाऊ नये. दंड आणि व्याज भरण्याबाबत अटी आणि शर्ती रद्द करव्यात, मागील देयक भरण्यासाठी अभय योजनेच्या मुदतीमध्येदेखील वाढ करावी, अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संतोष शेट्टी, नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत उपस्थित होते.रोजगार बंदलॉकडाउनमुळे अनेक नागरिकांच्या रोजगाराची साधने बंद आहेत. लघू उद्योगांवरही परिणाम झाला आहे. उत्पन्नाचे साधनच नसल्याने नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मालमत्त कर माफ करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.
CoronaVirus: 'नवी मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 1:01 AM