Coronavirus: कोविड योद्ध्याची मृत्यूनंतरही उपेक्षा; डॉक्टरसह पत्नीचा मृतदेह चार दिवस शवागृहातच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:40 AM2020-05-07T07:40:37+5:302020-05-07T07:40:49+5:30
कोरोना अहवाल मिळण्यास विलंब
नामदेव मोरे
नवी मुंबई : सीवूड सेक्टर ४८ मध्ये राहणाऱ्या डॉक्टरचा रविवारी मृत्यू झाला. दुसºया दिवशी त्यांच्या पत्नीचेही मनपा रुग्णालयात निधन झाले. या दोघांचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने त्यांचे मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत. मुलासही
रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर व त्याच्या कुटुंबीयांच्या शोकांतिकेविषयी परिसरात हळहळ
व्यक्त केली जात असून प्रशासकीय उदासीनतेविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सीवूडमध्ये राहणारे डॉक्टर गोवंडीमध्ये दवाखाना चालवितात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी दवाखाना बंद
केला होता. परंतु मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सूचनेवरून ते पुन्हा सेवेत दाखल झाल्याची माहिती डॉक्टर राहत असलेल्या सोसायटीमधून मिळाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी स्वत:च स्वत:वर उपचार सुरू केले होते. रविवारी ३ मे रोजी सकाळी त्यांचे
घरामध्येच निधन झाले. पत्नी व १७ वर्षाच्या मुलाने सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर तात्काळ खाजगी व मनपा रूग्णालयात
फोन करून रूग्णवाहीका मागविली. परंतु दोन तास रूग्णवाहिका आलीच नाही. दुपारी १२ ते १ दरम्यान रूग्णवाहिकेमधून डॉक्टरांना
रूग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबियांना पोलीस स्टेशनची व इतर कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
डॉक्टरची पत्नी व लहान मुलगा सायंकाळपर्यंत धावपळ करत होता. सायंकाळी त्यांच्या पत्नीला अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी व मनपा
रूग्णालयातून रूग्णवाहीका बोलावली. नेरूळ व वाशीतील खासगी रूग्णालयात त्यांना घेण्यात आले नाही. शेवटी रात्री त्यांना मनपा
रूग्णालयात दाखल केले. मुलास दाखल करून न घेता घरी पाठविले. सोमवारी पहाटे डॉक्टरच्या पत्नीचाही मृत्यू झाला. रविवारी डॉक्टरचा व सोमवारी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर पालिकेने मुलासही रूग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी दुपारपर्यंत दोघांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले नव्हते. संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अहवाल चोवीस तासात मिळणे अपेक्षित आहे.
परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे ते मिळू शकले नाहीत. डॉक्टर रहात असलेल्या सोसायटी मधील ८ इमारतीमध्ये एकूण १२८ फ्लॅट असून
जवळपास ५०० नागरिक राहतात. चार दिवस येथील पदाधिकारी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु योग्य प्रतिसाद मिळत नाही. एका कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांची होणारी अवहेलना पाहून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
नवी मुंबईमध्ये लॅबचा प्रस्ताव
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत नवी मुंबईमधील अहवाल जेजे रुग्णालयातील लॅबमध्ये पाठविले जात असून रिपोर्ट मिळण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी जात आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता नवी मुंबईमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं