CoronaVirus News: कोरोनाच्या छायेत शिक्षणाचा नवा आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:45 PM2020-08-13T23:45:25+5:302020-08-13T23:46:25+5:30

यंदा कोरोना विषाणूच्या महामारीने अख्ख्या जगात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे भारतातील अर्थव्यवस्थेबरोबर शैक्षणिक बाजूदेखील कोलमडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत.

CoronaVirus new dimension of education in the time of Corona | CoronaVirus News: कोरोनाच्या छायेत शिक्षणाचा नवा आयाम

CoronaVirus News: कोरोनाच्या छायेत शिक्षणाचा नवा आयाम

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कोरोना महामारीमुळे सारे काही बदलले आहे. प्रत्येकाचे राहणीमान, सवयी आणि एकं दर जीवनशैलीच बदलली आहे. यामुळे ओघाने लहान मुलांच्या शेैलीतही बदल झाला आहे. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीतदेखील शासनाला बदल करावा लागला. सध्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या तसेच खासगी शाळांमधूनही आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे. या शिक्षण पद्धतीचा अजूनही सर्वांनी मोकळेपणाने स्वीकार केलेला नसला तरी ही काळाची गरज बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामध्ये दोन मतप्रवाह आहेत, काही जण या शिक्षण पद्धतीला दोष देत आहेत, तर काही जण नावीन्याचा स्वीकार करून आनंद घेत आहेत.

यंदा कोरोना विषाणूच्या महामारीने अख्ख्या जगात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे भारतातील अर्थव्यवस्थेबरोबर शैक्षणिक बाजूदेखील कोलमडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. गत वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यातदेखील कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस वाढती संख्या पाहता शिक्षण क्षेत्राला कोरोनासारख्या संकटाला प्रभावीपणे सामोरे जावे लागत आहे. मात्र महाराष्ट्रातील शिक्षण प्रणाली या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून बाहेर पडताना दिसून येत आहे. शासनाकडून वेळोवेळी विद्यार्थ्यांचे हित जोपासत शिक्षण प्रणाली खंबीरपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. मराठी, इंग्रजी माध्यम असणाऱ्या तसेच जिल्हा परिषद शालेय शिक्षणात मुलांचा आणि पालकांचा ठाव घेत आॅनलाइन पद्धत स्वीकारून शिक्षण देण्यात या संकट काळात अग्रेसर ठरली आहे. डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत प्रगती साधण्याचा नक्कीच प्रयत्न करण्यात आला आहे.

पनवेल तालुक्यातील शिक्षण पद्धतीत जिल्हा परिषद शाळेबरोबरच खाजगी शिक्षण संस्थेने आॅनलाइन शिक्षण देण्याचा मानस अंगीकारून विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची काळजी घेतली आहे. दैनंदिन आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अर्धे वर्ष सरत आले म्हणण्यास हरकत नाही. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद २४८, महापालिका शाळा ११ आणि खाजगी शाळा २९६ त्याचबरोबर महाविद्यालये, विद्यापीठे यांची संख्या मोठी आहे. या सर्व शिक्षणातील अध्ययन आणि अद्यापन प्रक्रिया सुलभरीत्या पार पडताना दिसून येत आहे.

कोरोनाचे संकट असताना शिक्षण देण्यात येणाºया अडचणींवर मात करीत आॅनलाइन पद्धतीने सर्व सुरळीत झाले म्हणण्यास हरकत नाही. काही प्रमाणात आॅनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित आहेत. परंतु तिथेसुद्धा विविध मार्ग काढत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचत आहे. सद्य:स्थितीत आॅनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा शासनाचा निर्णय प्रभावी ठरला आहे. यात शालेय शिक्षणात शासनाकडून दिशा अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी जोडले गेले आहेत. तसेच १ली ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शन वाहिनीवर ‘टिली मिली’च्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यामुळे विद्यार्थी शिक्षण घेण्यात बºयाच अंशी रमले आहेत. त्याचबरोबर खाजगी संस्थेच्या माध्यमातूनसुद्धा दैनंदिन झूम अ‍ॅपद्वारे आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हेतर, संपूर्ण जगातील शिक्षण व्यवस्था आजच्या घडीला संभ्रमावस्थेतून जात आहे. काही देशांनी आॅनलाइन शिक्षण देण्याची सुविधा कित्येक वर्षांपासून उपलब्ध करून दिली आहे. भारतात गुरुकुल शिक्षण पद्धतीपासून सुरू झालेला प्रवास आता सर्व मर्यादा ओलांडून नव्या वळणावर पोहोचला आहे.

२१व्या शतकातील मुलांच्या गरजा, जाणिवा आणि शिकण्याच्या पद्धतीत या कोरोनामुळे बदल झाला आहे. शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या प्रक्रियेतील ही दरी कोरोनामुळे कमी होत चालली आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून प्रभावीसुद्धा ठरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिक्षण या कालावधीत मिळत आहे. डिजिटल शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाला जुनी पद्धत लांब करत, नव्या पद्धतीचा अवलंब करण्याची आज संधीच मिळाली असे म्हणावे लागेल. मुलांचेही नकळत दप्तराचे ओझे कमी होऊन शिक्षणाचा ताण कमी झाला असे
वाटत आहे.

शाळा व्यवस्थापनाकडून वेळापत्रक जारी
आॅनलाइन शिक्षण ई-लर्निंग, व्हर्च्युअल एज्युकेशन या संकल्पनांमध्ये चार भिंतींच्या आड घेतले जाणारे शिक्षण वेबिनार्स, फिल्म/ व्हिडीओ क्लिप्स, आॅडिओ प्रेझेंटेशन्स, आॅनलाइन ट्युटोरियल्स, लाइव्ह स्ट्रीमिंग लेक्चर्स आदी माध्यमातून प्रशिक्षण घेणे होय.
आॅनलाइन शिक्षणाच्या सत्रांचे वेळापत्रक शाळा व्यवस्थापनाने नियोजनबद्ध पद्धतीने आखले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे कमीतकमी वेळ मुले मोबाइलसमोर बसतील याची काळजीदेखील घेण्यात येत आहे. यामुळे मुलांनादेखील अभ्यासाचा ताण वाटत नाही.

Web Title: CoronaVirus new dimension of education in the time of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.