CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रातील १४७ इमारती सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:07 AM2020-05-29T01:07:45+5:302020-05-29T01:07:50+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ मेपर्यंत ४१९ वर गेला आहे.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल परिसरासह सिडको वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून २८ दिवसांचा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ मेपर्यंत ४१९ वर गेला आहे. यातून २५२ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. उर्वरित १४८ जणांवर उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पनवेल परिसरासह कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, तळोजा परिसरात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.
खारघर येथेही रुग्णसंख्या अधिक आहे. कामोठे येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे ८ मेपासून संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन जाहीर केले होते. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलासा देत एमजीएम रुग्णालय परिसर व औद्योगिक वसाहत वगळता मंगळवारी कंटेनमेंट झोन खुला करून दिला आहे.
संपूर्ण कंटेनमेंट झोनमुळे नागरिकांना अडथळे निर्माण होत असल्यामुळे यापुढे कोरोनाबाधित इमारतींना सील करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. याअगोदर कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, तळोजा हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन जाहीर न करता, इमारती सील केल्या आहेत.
पनवेल महापालिका परिसरात बुधवारपर्यंत १४७ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत परिसरातून ये-जा करण्यास मनाई आहे. २८ दिवसांचा कालवधी पूर्ण झाल्यानंतर कंटेनमेंट झोन खुले करण्यात येत आहेत.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना परिसर इमारत
पनवेल १४
नवीन पनवेल २४
कळंबोली २२
कामोठे ५७
खारघर २५
खारघर (घरकुल) ०४
तळोजा ०१
एकूण १४७