CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 01:31 AM2020-11-06T01:31:02+5:302020-11-06T01:31:18+5:30

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.

CoronaVirus News: 4705 Senior Citizens Corona-Free, Older People at Risk of Death in Navi Mumbai | CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. यानंतरही ज्येष्ठ नागरिकांचा धोका अद्याप टळलेला नाही. मार्चपासून आतापर्यंत तब्बल ५,५५६ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामधील ४,७०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ९० ते १०० वयोगटातील तब्बल ३६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत ४८६ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबळींमध्ये ५३.२३ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मृत्युदर कमी करण्यातही यश येऊ लागले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना बसला असून अद्याप त्यांचा धोका टळलेला नाही. मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ज्येष्ठांची आत्ताही काळजी घेणे आवश्यक आहे. 
१३ मार्चपासून आतापर्यंत नवी मुंबईमध्ये तब्बल ४५,०३१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये ५,५५६ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 
यामध्ये ६० ते ७० वयोगटातील सर्वाधिक ३,७३६ रुग्ण आहेत. एकूण रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण १२.३३ एवढे असले तरी मृत्यू होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण ५३ टक्के आहे. शहरात एकूण ९१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ४८६ ज्येष्ठ नागरिक आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण अद्याप ८४ टक्के आहे.यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी ज्येष्ठ नागरिकांची यापुढेही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.


शंभर वर्षाचे रुग्णही बरे
ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असला तरी अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. आतापर्यंत ६० ते ७० वयोगटातील ३२५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ७० ते ८० वयोगटातील १,१६७ जण बरे झाले आहेत. ८० ते ९० वर्षे वयोगटातील २४६ व ९० ते १०० वर्षे वयोगटातील ३६ जण बरे झाले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. सहव्याधी असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. 

वयोगटानुसार रुग्णांचा तपशील
वयोगट     एकूण रुग्ण    कोरोनामुक्त     मृत्यू     शिल्लक
० ते १०         २०४१          १९८३             १                 ५७
११ ते २०       ३३६८             ३२६२     ५                 १०१
२१ ते ३०        ८९१६             ८६२९             २०               २६७
३१ ते ४०        ९८३५             ९५०५            ५०             २८०
४१ ते ५०        ८३८२             ८००५             १०६             २७१
५१ ते ६०        ६९३३            ६४४२            २४५             २४६
६१ ते ७०       ३७३६          ३२५६             २६१             २१९
७१ ते ८०      १४४७          ११६७              १६१             ११९
८१ ते ९०       ३३३     २४६               ६१              २६
९१ ते १००       ४०                    ३६             ३                 १

Web Title: CoronaVirus News: 4705 Senior Citizens Corona-Free, Older People at Risk of Death in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.