नवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे. मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे महानगरपालिकेने भरतीप्रक्रिया सुरू केली होती. ५१ डॉक्टर्स, १४३ स्टाफ नर्सेस व ४२ एएनएमची तत्काळ भरती केली असून त्यांना नियुक्तीपत्रही दिले. नवी मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून त्यांना उपचार मिळवून देताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. मनपाने बंद केलेली कोरोना उपचार केंद्र पुन्हा सुरू केली आहेत. परंतु, या केंद्रांमध्ये डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांची कमतरता भासू लागली होती. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ भरतीप्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी मनपा मुख्यालय व विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मुलाखती घेण्यात आल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ५१ डॉक्टर्स, १४३ स्टाफ नर्सेस, ४२ एएनएम यांना नियुक्तीपत्र दिले आहेत.महानगरपालिकेची तात्पुरत्या स्वरूपातील भरतीप्रक्रिया सुरूच राहणार आहे. वैद्यकशास्त्रतज्ज्ञ, मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्ट , एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी मनपाच्या संकेतस्थळावरील लिंकवर अर्ज करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
CoronaVirus News: महानगरपालिकेच्या सेवेत ५१ नवीन डॉक्टर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:48 AM