CoronaVirus News: संकटातून बाजार समिती सावरतेय; निर्बंध झाले शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:55 PM2020-08-13T23:55:14+5:302020-08-13T23:55:25+5:30
धान्य मार्केटमध्येही प्रतिदिन आवक-जावक सुरू
नवी मुंबई : कोरोनाच्या संकटातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सावरू लागली आहे. व्यापारासाठीचे निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. धान्य मार्केटमध्ये गुरुवारपासून प्रतिदिन आवक-जावक सुरू झाली असून, भाजी मार्केटमधील टोकनपद्धतही लवकरच बंद केली जाणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे एप्रिलपासून व्यापारावर विविध निर्बंध लादण्यात आले होते. धान्य मार्केटमध्ये एक दिवस आवक व एक दिवस जावक असे नियोजन करण्यात आले होते. यामुळे आठवड्यातून तीनच दिवस कृषी मालाची प्रत्यक्षात विक्री होत होती. यामुळे देशभरातून माल घेऊन येणाऱ्यांना एक दिवस रखडावे लागत होते. याचा परिणाम व्यवसायावर होऊ लागला होता. प्रशासनाने गुरुवारपासून प्रतिदिन आवक व जावकला परवानगी दिली आहे. भाजीपाला मार्केटमध्येही व्यवसाय करण्यासाठी टोकन पद्धत कार्यान्वित केली आहे. टोकन पद्धतीविषयी नाराजी वाढत असल्यामुळे तीही लवकरच रद्द करण्यात येणार आहे.
बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन चाचण्याही केल्या जात आहेत. व्यापारी, कामगारांमध्येही जनजागृती केली आहे. प्रवेशद्वारावर तापमान व आॅक्सिजन पातळी तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. यापुढे सर्व उपाययोजना करून मार्र्केट सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून धान्य मार्केटमध्ये एक दिवस आवक व एक दिवस जावक असे व्यापाराचे नियोजन केले होते. हे निर्बंध आता उठविण्यात आले असून, यापुढे प्रतिदिन आवक व जावक सुरू राहणार आहे. सर्व मार्केट पूर्ववत सुरू केली जात आहेत.
- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
गुरुवारी आलेली वाहने
भाजीपाला मार्केट ३२२
फळ मार्केट १३२
कांदा-बटाटा मार्केट ११५
मसाला मार्केट ४८
धान्य मार्केट १६७