CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 11:24 PM2020-09-17T23:24:14+5:302020-09-17T23:25:00+5:30
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा कोरोनाचा विसर पडला आहे. सर्वच मार्केटमध्ये मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर केलेला खर्चही व्यर्थ जात आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व गर्दी नियंत्रणात न आणल्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार व बाजार समिती कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे ते वास्तव्य करीत असलेल्या परिसरामध्येही प्रादुर्भाव वाढला होता. बाजार समितीविषयी शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या. मार्केटमध्ये येणाºया वाहनांवर व खरेदीसाठी येणाऱ्यांच्या संख्येवरही निर्बंध लावले. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण, प्रवेशद्वारावर आॅक्सिजन व तापमान तपासणी सुरू केली. परंतु मागील काही दिवसांपासून नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यास सुरुवात झाली आहे. पाचही मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. कामगार, व्यापारी, खरेदीदार मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भाजी व फळ मार्केटमधील परिस्थिती सर्वांत जास्त भयावह आहे. दोन्ही मार्केटमध्ये परराज्यातील व रोजंदारीवरील काम करणाºयांची संख्या पुन्हा वाढली आहे. यामधील बहुतांश कामगार मार्केटमध्येच वास्तव्य करीत आहेत. हे कामगार सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. व्यापारीही त्यांच्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतु निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. बाजार समितीच्या अनेक अधिकारी व कर्मचाºयांनाही लागण झाली आहे. अनेकांच्या परिवारातील सदस्यांनाही लागण झाली आहे. व्यापारी, कामगार बाजार समिती कर्मचाºयांचाही मृत्यू होऊ लागला आहे. यानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवेशद्वारावरील आॅक्सिजन व तापमान तपासणी केंद्र फक्त नावापुरते शिल्लक राहिले आहे. त्या ठिकाणी कोणीही तपासणीसाठी फिरकताना दिसत नाही. आवक, जावकवरील निर्बंधही उठविले असल्यामुळे मार्केटमध्ये येणाºया - जाणाºयांवर काहीही नियंत्रण राहिलेले नाही. अशीच स्थिती राहिली तर बाजार समितीमध्ये कोरोनाची लाट पुन्हा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुटखा विक्रेत्यांनाही अभय : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाजार समितीमध्ये फक्त परवाना असणाºयांनाच परवानगी देण्यास सुरुवात झाली. बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाºयांना मार्केटमधून बाहेर हाकलण्यात आले होते. परंतु काही दिवसांपासून गुटखा, तंबाखू व गांजा विक्रेत्यांनी पुन्हा त्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत. भाजी व फळ मार्केटमध्ये सर्वांसमक्ष तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असून बाजार समितीचे सुरक्षारक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी या माफियांना अभय देऊ लागले आहेत.
गर्दी जैसे थे : एप्रिलमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या होत्या. परंतु सद्य:स्थितीमध्ये मार्केटमधील गर्दी जैसे थे झाली आहे. भाजी मार्केटमधील पॅसेजमधून सकाळी चालताही येत नाही अशी स्थिती आहे. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन
होताना दिसत नाही.
बाजार समितीमधील
१७ सप्टेंबरची वाहनांच्या आवकचा तपशील
मार्र्केट आवक
कांदा-बटाटा मार्केट ८७
भाजी मार्केट ४५०
फळ मार्केट २०९
मसाला मार्केट ११०
धान्य मार्केट १७५
एकूण १०३१