CoronaVirus News : एटीएम बनताहेत कोरोना संसर्गाची केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:40 AM2020-08-21T01:40:14+5:302020-08-21T01:40:41+5:30
नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित बँकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कळंबोली : कोरोनाच्या काळात पनवेल परिसरातील एटीएम केंद्रातील सुरक्षिततेचा फज्जा उडाला आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरातील मोजके एटीएम सोडले तर बहुतांश एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत, त्याचबरोबर त्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापरही केला जात नाही. नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित बँकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात स्टेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र , एचडीएफसी, अॅक्सिस बँक, आयडीबीआय यांसारख्या राष्ट्रीयीकृत बँका आणि अर्बन बँक व अन्य खाजगी बँकांची एटीएम केंद्रे आहेत. या एटीएममध्ये एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण काळजी घेतली गेली; परंतु आॅगस्ट महिन्यापासून एटीएम केंद्रे असुरक्षित झाली आहेत. नवीन पनवेल येथील एचडीएफसी चौक, पनवेल रेल्वे स्थानकासमोर, पनवेल उरण नाका, कळंबोली एसबीआय चौक तसेच कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानक रोडवरील बहुतांश एटीएममध्ये सुरक्षारक्षक नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. त्यामुळे इथल्या एटीएममध्ये गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर सामाजिक अंतरही पाळले जात नाही. बरेच नागरिक मास्कचाही वापर करीत नाहीत. दररोज हजारो ग्राहकांनी एटीएम हाताळल्याने कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित बँक व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
>स्लिपचा कचरा
काही ग्राहकांकडून पैसे काढल्यानंतर स्लिप चुरगाळून फेकून दिली जात आहे.
या स्लिप अस्ताव्यस्त पडल्याने कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.
त्यामुळे एटीएम केंद्रांत अस्वच्छता दिसून येत आहे. तर काही एटीएमवर धूळ साचली आहे.