CoronaVirus News: वाढत्या रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:05 AM2021-04-04T01:05:14+5:302021-04-04T01:05:31+5:30
रुग्णसंख्या सात हजारपेक्षा जास्त; रुग्णालयांत ४१८८ खाटांची क्षमता
नवी मुंबई : शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून, प्रतिदिन ७०० ते ९०० रुग्ण वाढत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारपेक्षा जास्त झाली असून, मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४१८८ रुग्णखाटा उपलब्ध आहेत. जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये आयसीयू युनिट फुल्ल झाले आहेत. मनपाकडे आयसीयूची कमतरता असल्यामुळे पूर्णपणे खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे.
राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. वेगाने रुग्ण वाढत असून, त्यांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे.
महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जनरल व ऑक्सिजन रुग्ण खाटांची सुविधा आहे. परंतु आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाबरोबर मनपाने करार केला आहे. परंतु तेथील व्यवस्थाही कमी पडू लागली आहे. यामुळे आयसीयूसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे.
डॉक्टर्सची कमतरता
महानगरपालिका प्रशासनाने डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांची भरती सुरू केली आहे. परंतु मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. यामुळे नवीन आयसीयू युनिट व नवीन उपचार केंद्र सुरू करता येत नाहीत. खासगी रुग्णालयांमध्येही मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. यामुळे भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देताना कसरत करावी लागणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्ण खाटांच्या उपलब्धतेविषयी दिलेली आकडेवारी व प्रत्यक्षात वस्तुस्थिती यामध्ये खूप फरक आहे. रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड उपलब्ध होत नाहीत. आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये जागा मिळवून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
- राजू शिंदे, माजी आरोग्य सभापती
महानगरपालिका
हेल्पलाइन सुरू करणार
वाढणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्पलाईनवर चोवीस तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. रुग्णांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना शहरातील कोणत्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत, याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी शहरातील खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनांशी चर्चा करून युद्धपातळीवर आयसीयू युनिट वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर शहरात किती रुग्णखाटांची सुविधा आहे, कोणत्या रुग्णालयात किती रुग्णखाटा शिल्लक आहेत, याची माहिती दिली आहे.
परंतु संबंधित रुग्णालयांशी संपर्क केल्यानंतर प्रत्यक्षात जागा नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळवून देण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. राजकीय प्रतिनिधींनाही रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.