CoronaVirus News: डॉक्टरांच्या कार्यप्रणालीत केले बदल; महापालिका आयुक्तांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 11:58 PM2020-08-09T23:58:10+5:302020-08-09T23:58:18+5:30
मृत्युदर रोखण्यासाठी 'मिशन ब्रेक द चेन'
नवी मुंबई : कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंताजनक असून, रुग्ण वाढले तरी चालतील,परंतु कोणाचाही मृत्यू होता कामा नये, अशी भूमिका महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. त्या अनुषंगाने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाशी येथील डेडिकेटड कोविड रुग्णालयातील डॉक्टरांसाठी सुधारित कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे.
कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी आयुक्त बांगर दरदिवशी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. वाशी सेक्टर १0 येथील महापालिकेच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात गंभीर स्वरूपाची लक्षणे असणाºया कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत, अशी आयुक्त बांगर यांची भूमिका आहे.
त्यानुसार, येथे कार्यरत असणाºया ११ तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्यप्रणालीत बदल करण्यात आला आहे. त्यांच्या कामकाजाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. हे नवीन वेळापत्रक रविवारपासून लागू झाले.
नवीन वेळापत्रकानुसार, संबंधित डॉक्टरांनी नेमून दिलेल्या वेळेत वॉर्ड किंवा आयसीयू कक्षात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच संबंधित डॉक्टरांनी रुग्णांवर वैयक्तिक लक्ष ठेवायचे आहे.
प्रत्येक तासांनी रुग्णाच्या आरोग्य स्थितीचा आढावा घ्यायचा आहे. नवीन आदर्श उपचार प्रणालीनुसार कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करण्याची जबाबदारी आता संबंधित डॉक्टर्सवर असणार आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत १८,४८१ कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल १४,२८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ४६९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ उपक्रमावर अधिक भर दिला आहे. त्याद्वारे रुग्णाचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करून कोरोनाची चाचणी खंडित करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.
मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार अशा स्वरूपाचे आजार असणाºया रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे.
वैद्यकीय अधीक्षकांचा असणार वॉच
आदर्श उपचार प्रणालीनुसार डॉक्टर्स कोविड वॉर्ड किंवा आयसीयू कक्षात नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित आहेत की नाही, तसेच रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत का, याची पाहणी करण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
वैद्यकीय अधीक्षकांनी दिवसातून किमान तीन वेळा कोविड वॉर्ड आणि आयसीयू कक्षात जाऊन पाहणी करणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.