CoronaVirus News: मुलुंडमध्ये सिडको उभारणार कोविड हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:41 PM2020-06-15T23:41:13+5:302020-06-15T23:41:23+5:30
राज्य सरकारचे निर्देश; अत्यावश्यक सुविधांसह १000 खाटांची क्षमता
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : ठाणे महापालिकेच्या मागणीनुसार राज्य सरकारने १000 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी दिली आहे. हे हॉस्पिटल उभारण्याची जबाबदारी सिडको महामंडळावर टाकण्यात आली आहे. दरम्यान, सिडकोच्या माध्यमातून मुलुंड येथे १८00 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने सक्षम उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या शहरात कोविड हॉस्पिटल उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. तसे निर्देश संबंधित प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने सिडकोच्या सहकार्यातून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १२00 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. तर सिडकोच्या माध्यमातून मुलुंड येथील आर मॉलच्या जवळील २0 एकर जागेवर १८00 खाटांचे कोविड रुग्णालय बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सिडकोवर आता ठाणे शहरात कोविड रुग्णालय उभारण्याची जबाबदारी सोपविली आहे. सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सिडको ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १000 खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुलुंड येथील रुग्णालयाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
पुढील दोन-तीन दिवसांत हे रुग्णालय राज्य सरकारला सुपुर्द केले जाईल, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १000 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबातचे राज्य सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहेत. महापालिकेकडून जागा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्षात रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल.
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको