CoronaVirus News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:15 AM2021-04-14T00:15:50+5:302021-04-14T00:16:17+5:30
CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे.
- वैभव गायकर
पनवेल : कोरोनाने समाजामध्ये एक प्रकारे मोठी दरी निर्माण केली आहे. संसर्गामुळे जवळचे नातेवाईकही यामुळे दुरावले असून सध्याच्या घडीला या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे नातेवाईकही बेहाल झाले आहेत. दवाखान्यात दाखल केलेल्या रुग्णांची देखरेख व्यवस्थित होत आहे की नाही, याबाबतही नातेवाइकांना योग्यरीत्या माहिती मिळत नसून, नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर रात्र घालवावी लागते.
पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे. विशेष म्हणजे आजच्या घडीला सुमारे ४४५० विद्यमान रुग्ण पालिका क्षेत्रात आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांचे बहुतांश नातेवाईक क्वारंटाईन आहेत; तर या रुग्णांची माहिती घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर दिवस काढावे लागत आहेत.
नातेवाइकांकडे जाता येत नाही अन् ....
कोरोना झाल्यावर घरातील क्वारंटाईन सदस्यांना घरातून बाहेर जाता येत नाही. त्यामुळे नातेवाइकांचीही मदत घेता येत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात दुकानेही बंद असल्याने ज्या घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशा सदस्यांचे मोठे हाल सुरू आहेत. एखाद्या संस्थेने पुढाकार घेऊन क्वारंटाईन सदस्यांना अत्यावश्यक सेवेतील वस्तू पुरविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
घरातील दोन सदस्य पॉझिटिव्ह आल्याने आम्हाला घराबाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे कोणाकडे मदतीचा हात मागितला असता थेट नकार न देता मदतीसाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- आनंद मेश्राम
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात गैरसमजही पसरले आहेत. आमचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर होता. इकडे आल्यावर प्रवासादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र आमच्या शेजाऱ्यांनी आमच्याशी बोलणे टाळले आहे.
- केदार रामघरात
कोविड झाल्यावर आपण एखादा गुन्हा केल्याचा समाजाचा समज होत आहे. मदत तर सोडा; विचारपूस करायलादेखील कोणी पुढे येत नाही. कोरोनाबाबत समाजाची मानसिकता सुधारण्याची गरज आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो.
- किशोर सोनुने