CoronaVirus News: कोरोनामुळे एपीएमसीचे उत्पन्न आले निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:08 AM2020-08-15T00:08:41+5:302020-08-15T00:08:58+5:30
तीन महिन्यांत ९.४४ कोटींचा फटका; अनिश्चिततेसह बंदमुळे परिणाम
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत ९ कोटी ४४ लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. व्यापारामधील अनिश्चितता व कोरोना रोखण्यासाठी मार्केट बंद ठेवावे लागल्यामुळे हा फटका बसला आहे.
कोरोनाच्या महामारीमध्येही मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा वाटा आहे. बाजार समिती नसती, तर दीड कोटी नागरिकांना अन्नधान्य पुरविणे शासनास अशक्य झाले असते. अनेक संकटांना सामोरे जाऊन मार्केट सुरू ठेवली असली, तरी या काळात एपीएमसीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गतवर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत एपीएमसीला १८ कोटी ५६ लाख ९ हजार रुपये उत्पन्न झाले होते. या वर्षी फक्त ९ कोटी ११ लाख रुपयेच उत्पन्न झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९ कोटी ४४ लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर काही दिवस मार्केट बंद ठेवावे लागले. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या धान्य मार्केटमध्ये एक दिवस आवक व एक दिवस जावक असे नियोजन करावे लागले. यामुळे आठवड्यातून तीन किंवा चार दिवसच मालाची प्रत्यक्ष विक्री केली जात होती. त्यामुळे तेथील उत्पन्न घसरले आहे.
मसाला मार्केटमधूनही एपीएमसीला भरपूर उत्पन्न होत होते, परंतु पहिला रुग्ण याच मार्केटमध्ये सापडला व कोरोनामुळे पहिला बळीही याच मार्केटमधील व्यापाºयाचा गेला. परिणामी, येथील व्यवहारावर परिणाम झाला. अनेक व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने माल मागवणे कमी केले. यामुळे येथील उत्पन्न कमी झाले आहे.
ऊसाचा हंगाम शून्यावर
मुंबई, नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला मोठी मागणी असते. या वर्षी लॉकडाऊनमुळे ऐन उन्हाळ्यात सर्व रसवंतीग्रह बंद
होती. त्यामुळे याचाही फटका बसला आहे. गतवर्षी ऊस मार्केटमधून बाजार समितीला तीन महिन्यांत ५ लाख ९८ हजार महसूल मिळाला होता. या वर्षी एक रुपयाही महसूल मिळाला नाही.
शहाळे विक्रीवरही परिणाम
मुंबई, नवी मुंबई परिसरात शहाळ्याला खूप मागणी आहे. दक्षिणेकडील राज्यातून ओला नारळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. गतवर्षी शहाळे मार्केटमधून एपीएमसीला एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ४६ लाख ४२ रुपये उत्पन्न मिळाले होते. या वर्षी हे उत्पन्न फक्त २ लाख ४६ हजार एवढेच मिळाले आहे
खर्चात वाढ
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. यामुळे बाजार समितीच्या खर्चात वाढ झाली आहे. भविष्यात उत्पन्न वाढले नाही, तर मार्केटची देखभाल करताना ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.