CoronaVirus News : कोरोनाचा पोलीस ठाण्यात शिरकाव, अधिकाऱ्यांसह कर्मचारीही बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:05 AM2020-06-25T01:05:50+5:302020-06-25T01:05:56+5:30
नवी मुंबईत कोरोना पसरू लागताच, पोलिसांकडून बंदोबस्त दरम्यान विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने अखेर पोलीस ठाण्यातही शिरकाव केला आहे. नवी मुंबई पोलीस दलातील १७० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यापैकी १२० जणांची उपचारानंतर प्रकृती ठणठणीत झाली आहे. सुदैवाने यामध्ये एकानेही प्राण गमावले नाहीत.
नवी मुंबईत कोरोना पसरू लागताच, पोलिसांकडून बंदोबस्त दरम्यान विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती. त्याकरिता बंदोबस्तावरील पोलिसांना सॅनिटाइज करण्याचे वाहन तयार करण्यापासून ते पोलीस ठाण्याच्या प्रवेशावरही सॅनिटाइज होण्याची साधने पुरविण्यात आली होती. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त किरकोळ तक्रारींसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली होती.
त्यानंतरही सुरुवातीचा एक महिना सुरक्षित काढल्यानंतर, मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता पोलीस ठाण्यापर्यंतही कोरोनाचा संसर्ग पोहोचल्याने प्रत्यक्षात कामकाजावरही परिणाम दिसून येऊ लागला आहे. मागील दोन महिन्यांत बंदोबस्तावेळी अथवा नकळत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने, पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामळे परिमंडळ एक व दोनमध्ये अद्यापपर्यंत १७० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचारासाठी कळंबोली व नेरुळ येथे विशेष कॉरंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहेत, तर प्रकृती गंभीर असल्यास उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात सोय करून ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर १२० पोलीस ठणठणीत झाले आहेत, तर ५० जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
>कामकाजावर परिणाम
मागील काही दिवसांत वरिष्ठ निरीक्षकासह दुय्यम दर्जाचे पोलीस निरीक्षकही कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. तर उपायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कॉरंटाईन व्हावे लागले होते.
पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकारी व कर्मचारी यांनाही कॉरंटाइन व्हावे लागत आहे.याचा परिणाम अनेक पोलीस ठाण्यातल्या कामकाजावर जाणवत आहे.