CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ८९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 12:35 AM2020-10-04T00:35:26+5:302020-10-04T00:35:38+5:30

CoronaVirus Navi Mumbai news: नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढतेय; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर

CoronaVirus News: Corona virus recovery rate is 89 percent | CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ८९ टक्के

CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ८९ टक्के

Next

- आविष्कार देसाई 

रायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८९ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. नागरिकही आपल्यासह कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या शरीरात कोरोनाला हरवणाऱ्या अँटीबॉडीज निर्माण झाल्याने कोरोना विरोधातील लढाई आता निणार्यक टप्प्यावर आली असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात समूह संसर्गाच्या दिशेने जाणारा जिल्हा आता ठरावीक टप्प्यावर विसावला आहे.

जिल्ह्यामध्ये ८ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला संशयित सापडला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. आतापर्यंत एक लाख ६५ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. दिवसाला सुमारे चार हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. ४७ हजार ६६४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी ४१ हजार ९०७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही आकडेवारी २ आॅगस्टची आहे.
सद्यस्थितीमध्ये ८ टक्के म्हणजेच चार हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल एक हजार ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ते प्रमाण तीन टक्के आहे. ज्यांना विविध आजार आहेत, त्यांनाच मृत्यूने कवटाळले असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाला धिराने सामोरे गेल्यास आपण त्याला हरवू शकतो. यासाठी आपणाला काही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्याने औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढल्याने त्रास जास्त होतो. सकारात्मक विचार खूपच महत्त्वाचे आहेत, असे कोरोना विरोधातील लढाई जिंकलेले पत्रकार अ‍ॅड. रत्नाकर पाटील आणि भारत रांजणकर यांनी सांगितले.

दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामागे त्यांच्यामधील अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसांतच रुग्ण बरे होत असल्याचे दररोज रुग्णांच्या अभ्यासावरून दिसून येते, असे येथील डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. तापाचा रुग्ण औषधे घेऊन बरे होतात. त्याचप्रमाणे, या आजाराबाबतही ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तारीख रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मृत्यू
२ जुलै २,७७४ (५५ टक्के) १३०२(३ टक्के)
३ आॅगस्ट १२,५७५(७७ टक्के) १३०२(३ टक्के)
२ सप्टेंबर २३,९२९ (८३टक्के) १३०२(३ टक्के)
२ आॅक्टोबर ४२,३५६ (८९ टक्के) १३०२(३ टक्के)

सरकार आणि प्रशासनाने सातत्याने कोरोनाच्या विरोधातील उपाययोजना राबवल्या आहेत. नागरिकही सजग झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे खूपच चांगले आहे. नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचाच हा परिणाम आहे. ज्यांना काही आजार आहेत, त्यांना बरे होण्यास वेळ लागत आहे अथवा त्यांचा मृत्यू होत आहे.
- डॉ. सुहास माने,
जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: CoronaVirus News: Corona virus recovery rate is 89 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.