CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना ७५ लाखांचा विमा; महानगरपालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:32 PM2020-06-15T23:32:23+5:302020-06-15T23:32:33+5:30
इतर विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांची तरतूद
नवी मुंबई : कोरोना योद्ध्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाख रुपये विमा कवच देण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने त्यामध्ये २५ लाखांची भर टाकून ७५ लाख रुपये विमा कवच देण्याचे निश्चित केले आहे. आरोग्यव्यतिरिक्त विभागातील कोरोनासाठी काम करणाऱ्यांसाठीही ५० लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या महामारीमध्ये कर्तव्यावर हजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठीही विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्य:स्थितीमध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू होणाºया कर्मचाºयांसाठी केंद्र शासनाकडून ५० लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिकेकडूनही मदत व्हावी यासाठी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कामगार कल्याण निधीमधून २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यामुळे दुर्दैवाने एखाद्या अधिकारी व कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ७५ लाख रुपये मिळणार आहेत. ही योजना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी आहे. इतर विभागांमधील अधिकारी व कर्मचारीही कोरोनाविषयीच्या कामामध्ये सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्यासाठी अद्याप शासनाची काहीही योजना नाही. महानगरपालिकेने त्यांच्यासाठी ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
प्राप्त प्रकरणाच्या छाननीसाठी विशेष समिती
जे कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर आहेत. तसे संबंधित विभागप्रमुखांनी प्रमाणित केले आहे अशाच कर्मचाºयांना हे विशेष सानुग्रह अनुदान लागू असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व प्राप्त प्रकरणांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दोन, यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे उपआयुक्त हे त्या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.