CoronaVirus News: उरणमधील कोरोनाग्रस्त महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:34 PM2020-06-15T23:34:02+5:302020-06-15T23:34:08+5:30
२८ वयाच्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेने नेरूळ येथील एका खासगी रुग्णालयात एका सुदृढ बाळाला जन्म दिला
नवी मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू केले आहे. एका २८ वयाच्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेने नेरूळ येथील एका खासगी रुग्णालयात एका सुदृढ बाळाला जन्म दिला असून सोमवारी १५ जून रोजी सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बाळाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे.
उरण येथे राहणाऱ्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेला प्रसूतीसाठी नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या गर्भाला ३६ आठवडे पूर्ण झाले होते. प्रोटोकॉलप्रमाणे त्या महिलेची चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. परंतु सुदैवाने या महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली नव्हती. गर्भवती महिला कोविड पॉझिटिव्ह असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते; परंतु नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. कोविड-१९ संसर्गरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ, बालरोग विभाग या मार्गदर्शक गाइडलाइनचा आधार घेत एक डिटेल्स स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली होती. ८ जूनला या महिलेच्या प्रसूतीनंतर बाळाला विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.
बाळाचा अहवाल निगेटिव्ह
तिसºया दिवशी बाळाची कोरोना तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली. कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही या महिलेचे सीझर केले. आज १० दिवसांनी या महिलेला घरी सोडले असल्याची माहिती डॉ. दीपा काला यांनी दिली.