नवी मुंबई : महापालिकेमार्फत काही रेल्वे स्थानकांवर मोफत कोविड चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी चाचणी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तर चाचणीसाठी लागणाऱ्या रांगेतच एकमेकांपासून संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे पालिकेकडून अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्रांप्रमाणेच वाशी, सानपाडा, तुर्भे, बेलापूर, कोपर खैरणे, घणसोली व रबाळे स्थानकात चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्याठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच चाचणी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बहुतेक ठिकाणी प्रतिदिन दोनशेहून अधिक नागरिक कोविड चाचणीसाठी येत आहेत. त्यांना रेल्वे स्थानकाच्या आवारात जागा मिळेल त्याठिकाणी रांगा लावाव्या लागत आहेत. यामध्ये रेल्वे प्रवाशांची वाट अडवली जाऊन त्यांनाही संसर्ग पसरण्याचा धोका उद्भवत आहे. तर गैरसोयी बघूनच चाचणीला आलेले अनेकजण परत जात आहेत. असाच प्रकार घणसोली रेल्वे स्थानकातील चाचणी केंद्रावर मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी चाचणीला येणाऱ्या नागरिकांना भरउन्हात एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तर थोडीफार सावली मिळविण्याच्या प्रयत्नात सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय सॅनिटायझर व पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नसल्यानेही नागरिकांचे हाल होत आहेत. तर चाचणीच्या ठिकाणी प्रशासनाकडून पंखा पुरवण्यात आला नाही. यामुळे पीपीई कीट घालून तिथे काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था होत आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी बुधवारी त्यांना वापरासाठी पंखा व खुर्च्या दिल्या. मात्र चाचणी बंद झाल्यावर हे साहित्य ठेवून घेण्यास रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे घणसोली सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्रात चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याठिकाणी चाचणी सुरू केल्यास आरोग्य कर्मचारी व नागरिक यांची गैरसोय दूर होऊ शकते.रेल्वे स्थानकाच्या जागेत कोविड चाचणी केंद्रावर अनेक गैरसोयी आहेत. याचा त्रास आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांना होत आहे. त्यामुळे घणसोली सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्रात चाचणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी पालिकेकडे केली आहे. प्रशासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास चाचणीसाठी येणाऱ्यांची गैरसोय दूर होईल.- सचिन कटारे, सरचिटणीस- रिपाइं, युवक आघाडी.
CoronaVirus News: रेल्वे स्थानकांवरील चाचणी केंद्रावरील अपुऱ्या सुविधांमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:26 AM