CoronaVirus News: नवी मुंबईत खासगी डॉक्टरांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:18 AM2020-06-14T00:18:25+5:302020-06-14T00:18:35+5:30
कोरोनाचा धसका । संघटनांकडून प्रयत्न, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनामुळे घणसोली येथील खासगी डॉक्टरच्या निधनानंतर शहरातील खासगी डॉक्टरांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार खासगी डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सुविधा देत असले तरी एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांनादेखील विम्याचे संरक्षण देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील तीन महिन्यांत शहरात ३ हजार ५४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात घणसोली येथील रहिवासी व तुर्भेत दवाखाना असलेल्या एका डॉक्टरचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात मुंबईत दवाखाना चालवणाऱ्या सीवूड येथील डॉक्टर दाम्पत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु बुधवारी नवी मुंबईत सुविधा देणाºया डॉक्टरच्या निधनानंतर शहरातील सर्व डॉक्टर चिंतित झाले आहेत.
विविध संघटनांशी संलग्न असलेले सुमारे ५ हजार खासगी डॉक्टर शहरात आहेत. त्यापैकी बहुतांश डॉक्टरांचे स्वत:चे दवाखाने आहेत. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी स्वत:च्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी दवाखाने बंद केले होते. परंतु प्रशासनाने त्यांना कारवाईचा इशारा देऊन दवाखाने सुरू ठेवण्यास भाग पाडले. मात्र चार ते पाच फुटांवरून रुग्ण तपासणे प्रत्यक्षात शक्य नसल्याने डॉक्टरांना रुग्णांच्या संपर्कात जावेच लागत आहे. शिवाय कोणता रुग्ण कोरोनाबाधित आहे याचा उलगडाही सहज होत नसल्याने प्रत्येक रुग्ण तपासताना डॉक्टरांना धडकी भरत आहे. त्यानंतरही कोविड योद्धा बनून शहरातील खासगी डॉक्टर रुग्णांना सेवा पुरवत आहेत. त्यामुळे शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरदेखील प्रत्यक्षात कोरोनाविरोधातील लढ्यात लढत असताना त्यांनाही विम्याचे संरक्षण देण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनांकडून होऊ लागली आहे. तर शासन दखल घेत नसल्यास काही डॉक्टरांनी दवाखाने बंद करून घरी बसण्याचीदेखील तयारी ठेवली आहे. शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरही कोरोनाच्या महामारीविरोधात लढत असतानाही शासन त्यांच्या जीविताची हमी का घेत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांच्या विविध संघटना एकत्रित लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.
शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांना शासनाने विम्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे. किरकोळ दुखण्याने उपचारासाठी दवाखान्यात येणारा कोणता रुग्ण कोरोनाबाधित असेल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे रुग्णसेवा देत असताना डॉक्टरांनाही कोरोना होण्याची भीती आहे. अशाच प्रकारातून एका डॉक्टरचे निधन झाल्याने भविष्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टर चिंतित आहेत.
- डॉ. विनायक म्हात्रे, अध्यक्ष,
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), नवी मुंबई