कर्जत : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कर्जत तालुक्यात २७ मे रोजी आठ नवीन रुग्ण आढळून आले असून, तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. आजच्या नवीन रुग्णांमध्ये कर्जत शहरातील पाच आणि माथेरान शहरातील एक आणि ओलमणमधील एक लहान मुलगी या नवीन रुग्णांची भर पडली आहे.
कर्जत शहरात बुधवारी तब्बल पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात २५ मे रोजी कर्जत शहरातील गुंडगे भागातील मंगलमूर्ती इमारतीत लोणावळा येथून राहण्यासाठी आलेल्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींची २५ मे रोजी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्या टेस्टचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले असून पत्नी आणि दोन मुलांचे कोरोना टेस्टचे अहवालदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच त्या इमारतीच्या समोरील इमारतीतदेखील एक वयस्कर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. मुद्रे येथील एक ६१ वर्षीय व्यक्ती गेल्या चार दिवसांपासून पनवेल कळंबोली येथील रुग्णालयात उपचार घेत होती. त्या रुग्णाचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेलादेखील कोरोना झाला आहे. या परिचारिकेचे वास्तव्यदेखील मुद्रे भागात आहे. माथेरानमधील एका आठ वर्षीय मुलीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. आईकडून या मुलीला लागण झाली आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे पती यांचा अहवाल निगेटिव्ह तसेच ओलमणमधील एका दीड वर्षाच्या मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, उद्यापासून कर्जतमधील दुकाने तीन दिवस बंद राहणार आहेत.