CoronaVirus News : मृत्युदर रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:46 PM2020-06-22T23:46:51+5:302020-06-22T23:47:20+5:30
सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४,९६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २,८५0 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असले, तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरविणारा आहे. कारण सोमवारपर्यंत कोरोनाने १६८ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांतच ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून, मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिका मुख्यालयात कोविड १९ वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत, तेथे मास स्क्रीनिंग शिबिर भरविले जात आहेत. त्या माध्यमातून संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहेत. या अंतर्गत आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचार पद्धतीचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,२00 खाटांचे अद्यावत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
सुविधा व उपाययोजना पुरेशा व सक्षम असतानासुद्धा नवी मुंबईत मृतांचा आकडा मात्र दिवसागणिक वाढत आहे. १४ ते २२ जून या कालावधीत तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे.
शहरात आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे हे प्रमाण ३ टक्के इतके आहे, ही बाब शहरवासीयांच्या मनात धडकी भरविणारी व प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे.
>ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईचा दुसरा क्रमांक
ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका व तीन नगरपालिकांसह ठाणे ग्रामीण भागात सोमवारपर्यंत ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात २३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्या पाठोपाठ नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनामुळे १६८ जण मृत्युमुखी पडले आहेत. मिरा-भार्इंदर महापालिका कार्यक्षेत्रात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.
>पाच महापालिकांतील रूग्णांचा आढावा
महापालिकेचे नाव एकूण रूग्ण बरे झालेल मृत्यू
ठाणे ६२११ ३२४१ २३२
नवी मुंबई ४९६१ २८५0 १६८
कल्याण-डोबिंवली ३६९० १५९८ ७७
उल्हासनगर १0८९ ३२८ ३६
मिरा-भार्इंदर २२७५ १२५३ ११२
>मृतांची वाढणारी संख्या नक्कीच चिंताजनक आहे. हा मृत्युदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून ही टास्क फोर्स कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील डॉक्टर्स आवश्यक तेथे वैद्यकीय सल्ला देणार आहेत, तसेच रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होतात की नाही, यावर निगराणी ठेवणार आहेत. प्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सचाही अवलंब केला जाणार आहे.
- अण्णासाहेब मिसाळ,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका