CoronaVirus News: मृत्युदर रोखण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत; प्रत्येक प्रकरणाची केली जातेय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:46 PM2020-08-12T23:46:09+5:302020-08-12T23:46:20+5:30
महापालिका आयुक्त घेत आहेत रोज आढावा
- नामदेव मोरे
नवी मुुंबई : शहरातील कोरोनाचा मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले आहे. यासाठी मृत्यू झालेल्या प्रत्येक केसचा सविस्तर अभ्यास केला जात आहे. तज्ज्ञांशीही चर्चा केली जात असून, आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रतिदिन आढावा घेत आहेत.
नवी मुंबईमधील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर आली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. जास्तीतजास्त चाचण्या करायच्या. रुग्ण वेळेत शोधून त्यांना वेगळे करून उपचार करण्यावर भर दिला आहे. रुग्ण वाढले तरी चालतील, पण कोणाचाही मृत्यू होऊ नये, अशा सूचना मनपा व खासगी रुग्णालयांनाही दिल्या आहेत. आयुक्त स्वत: रोज मृत्यू होणाºया व्यक्तींवर काय उपचार केले, उपचारात काय त्रुटी राहिल्या का, याची माहिती घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशीही चर्चा केली जात आहे. खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही माहिती घेतली जात आहे. उपचार करणाºया मनपाच्या डॉक्टरांनाही वेबिनारद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशीही आयुक्त रोज चर्चा करत आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे मृत्युदर साडेतीनवरून अडीच टक्क्यांवर आला आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महानगरपालिकेच्या वाशी येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा रुग्णालयातील मृत्युदर कमी करण्यासाठीही ठोस पावले उचलण्यात आली आहेत. डॉक्टरांनी किती वेळा रुग्णाची तपासणी करावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किती वेळा वार्डमध्ये प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे, याविषयीही स्पष्ट लेखी आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या या उपाययोजनांना काही प्रमाणात यश येऊ लागले आहे. एक महिन्यापूर्वी मृत्युदर साडेतीनवर गेला होता. त्यामध्ये घसरण होऊन मृत्युदर अडीचवर आला आहे. शून्य मृत्युदर करण्यासाठी वेळेत रुग्णांचा शोध घेऊन तत्काळ उपचार करण्यावर भर देण्यात आला आहे. आयुक्त स्वत: प्रत्येक रुग्णावर लक्ष देत असल्याने, उपचार करणारे डॉक्टरही पूर्वीपेक्षा जास्त दक्ष झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. एक महिन्यापूर्वी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर आले होते. सद्यस्थितीमध्ये हे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढल्याने शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका
ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. ५0 वर्षांपेक्षा जास्त वय असेल व रुग्णास मधुमेह, हृदयविकारासह श्वसनाशी संबंधित आजार असल्यास मृत्यूची शक्यता जास्त असते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे उपचार व चाचण्या यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.
गंभीर रुग्णांवर विशेष लक्ष
गंभीर लक्षणे असलेल्या प्रत्येक रुग्णावर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. रुग्ण आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आवश्यकतेप्रमाणे वेळेत उपलब्ध व्हावा. रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबीयांशीही नियमित संपर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.