CoronaVirus News: बिनधास्त वावरल्याने 43.39 लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:02 AM2021-04-08T00:02:30+5:302021-04-08T00:02:47+5:30
नवी मुंबईत मास्क न घातलेल्यांची संख्या सर्वाधिक; नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी न घेणाऱ्या १७ हजार ९२९ जणांवर तीन महिन्यांत कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ४३ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात विनामास्क वावरणाऱ्या व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. यानंतरही पुरेशी खबरदारी न घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंडही आकारला जात आहे. त्यानुसार, चालू वर्षात तीन महिन्यांत तब्बल १७ हजार ९२९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधील काही कारवाया नवी मुंबई महापालिका व स्थानिक पोलीस यांनी संयुक्तरीत्या केल्या आहेत. त्यानुसार, कारवाई झालेल्या व्यक्तींकडून ४३ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात विनामास्क वावरणाऱ्या व्यक्ती आघाडीवर आहेत.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी मास्क वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. यानंतरही मास्क न वापरता अनेक जण गर्दीच्या ठिकाणी फिरत असतात, तर काही जण केवळ दिखाव्यासाठी हनुवटीला मास्क अडकवून फिरत असतात. अशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा प्रकारे विनामास्क वावरणाऱ्या ४ हजार ६३५ जणांकडून तीन महिन्यांत १७ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर योग्य खबरदारी न घेता आस्थापना चालवणाऱ्या ११५ व्यावसायिकांवर कारवाई करून ७ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा दंड शासन तिजोरीत जमा करण्यात आला आहे.
नागरिकांकडून नियमांचे पालन केले जावे, यासाठी पोलीस व महापालिका यांच्याकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून गर्दीच्या ठिकाणी अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी पाळत ठेवून या कारवाया केल्या जात आहेत. यानंतरही अनेक ठिकाणी पुरेशी खबरदारी न घेता, नागरिक वावरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत आहे. परिणामी, शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन गरजेचे आहे. यानंतरही अनेक जण विमा मास्क वावरत असून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. अशा १७ हजार ९२९ जणांवर तीन महिन्यांत कारवाई करून ४३ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- सुरेश मेंगडे,
पोलीस उपायुक्त