CoronaVirus News: जे.जे. रुग्णालयात होणार पालिकेच्या ५०० आरटीपीसीआर चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:50 AM2021-04-07T01:50:48+5:302021-04-07T01:51:03+5:30
पनवेल आयुक्तांचा पुढाकार
पनवेल : : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संशयित रुग्णांच्या कोराेनाच्या आरटीपीसीआर चाचण्या अहवाल अलिबाग येथील शासकीय लॅबमध्ये पाठविला जात आहे. परंतु या कोराेना चाचण्यांच्या अहवालाला अलिबागवरून येण्यास उशीर होतो. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने दैनंदिन ५०० कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या आता जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात येणार आहेत.
वाढती कोराेनाबाधितांची संख्या लक्षात घेता येथून पुढे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणीचे २०० नमुने हे अलिबाग येथील शासकीय लॅबमध्ये पाठविण्यात येतील तर उर्वरित नमुना चाचण्या या जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. या चाचण्यांचे अहवालही लवकर मिळणार असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
पनवेल क्षेत्रात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लॅब सुरू करण्याची मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली होती. ‘लोकमत’नेही याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख कोरोनाच्या रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच पुढाकाराने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी संपर्क साधून पनवेल क्षेत्रातील कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या जे.जे. हॉस्पिटल येथे करण्याची परवानगी मागितली होती. पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी जे.जे. हॉस्पिटल येथील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. जोशी यांच्याशी समन्वय साधून कोरोना आरटीपीसीआर चाचण्या करण्याविषयी पाठपुरावा केला होता.