CoronaVirus News: कळंबोलीत कोविड हॉस्पिटल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:43 AM2021-04-08T01:43:06+5:302021-04-08T01:43:12+5:30
पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : सिडकोच्या माध्यमातून पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या उपचाराकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून, कळंबोली येथे कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. बुधवारपासून रुग्णालय सुरू केले असून, सध्या ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यात येत आहे. तर लवकरच अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी रुग्णालय सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी दोन रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज पाचशेच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. यासाठी पनवेल परिसरात उपजिल्हा रुग्णालय, त्याचबरोबर कोन येथील इंडिया बुल्ससह खासगी १८ रुग्णालयांत कोविडवर उपचार करण्यात येत आहे, तरी नागरिकांना बेडची कमतरता भासत आहे. पनवेल परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडकोने कळंबोली समाज मंदिरात पाच कोटी रुपये खर्च करून कोविड रुग्णालयाची उभारणी केली. २ एप्रिल रोजी या रुग्णालयाचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले आहे. हे केंद्र चालवण्यासाठी मॅजिक डिल या संस्थेची निवड केली आहे. या रुग्णालयात अतिदक्षता १२ आणि ६० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे. बुधवारी ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यास सुरुवात केली असून, गुरुवारपासून अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे.