CoronaVirus News: रेमडेसिवीर इंजेक्शनचा मानवनिर्मित तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:35 AM2021-04-09T01:35:32+5:302021-04-09T01:35:47+5:30

पनवेलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ

CoronaVirus News: Man-made shortage of remedivirus injections | CoronaVirus News: रेमडेसिवीर इंजेक्शनचा मानवनिर्मित तुटवडा

CoronaVirus News: रेमडेसिवीर इंजेक्शनचा मानवनिर्मित तुटवडा

Next

वैभव गायकर,
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना, रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनची किंमत १ हजार रुपयांच्या आसपास असली, तरी अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने या इंजेक्शनचा चढ्या दराने विक्री होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. गुरुवारी अनेक नातेवाईकांना शहरातील विविध औषधी दुकाने, एजन्सी आणि कोरोना केंद्रांवर चकरा मारूनही हे इंजेक्शन मिळू शकले नसल्याचे पाहावयास मिळाले. पालिका क्षेत्रात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.

काही खासगी डॉक्टर रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता, ज्यांना आवश्यकता आहे, अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, अशा सूचनाही डॉक्टरांना देण्यात येणार आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. खासगी डॉक्टर कोरोना उपचारासाठी काही रुग्णांकडून अवाच्या सवा पैसे आकारत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. खासगी रुग्णालयांसाठी एक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्या दरपत्रकानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर डॉक्टरांना पैसे देण्यापूर्वी बिलाची तपासणी करावी. आकारण्यात आलेले पैसे बरोबर आहेत का, याची खात्री करून घ्यावे आणि मगच पैसे द्यावेत.

रेमडेसिवीर इंजेक्शन दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरीदेखील काही विक्रेते इंजेक्शनचा तुटवडा तसेच इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. पालिकेने याबाबतदेखील डॅशबोर्ड तयार करून उपलब्ध साठ्याची माहिती विक्रेत्यांना सार्वजनिक करण्याच्या सूचना केल्या पाहिजेत. पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद गोसावी यांना याबाबत विचारले असता, रेमिडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांना झालेला आहे. याबाबत माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: CoronaVirus News: Man-made shortage of remedivirus injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.