CoronaVirus News in Navi Mumbai: पनवेलमध्ये अडकले तब्बल १ लाख ७५ हजार स्थलांतरित मजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:01 AM2020-05-02T01:01:03+5:302020-05-02T01:01:18+5:30
केंद्र सरकराने या मजुरांना परप्रांतात पाठविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.
वैभव गायकर
पनवेल : पनवेल तालुका तसेच महापालिका परिसरात सुमारे एक लाख ७५ स्थलांतरित मजूर लॉकडाउनमुळे अडकल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकराने या मजुरांना परप्रांतात पाठविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.
पनवेल परिसर सध्याच्या घडीला हजारो बांधकामे सुरू आहेत. विशेषत: एमआयडीसी, स्टील मार्केट आदीसह विविध विकासकामे यांमुळे रोजगाराच्या शोधात आलेला मजूरवर्ग पनवेल, नवी मुंबई परिसरात स्थायिक झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउनची घोषणा झाल्याने बेरोजगार झालेले मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली. काही नागरिक पायीच परराज्यात जाण्यासाठी निघाले. अनेकांनी पायीच हजारो मैलाचे अंतर गाठून आपले गाव गाठले. मात्र, लॉकडाउनचे नियम आणखी कडक झाल्यावर अनेक कामगार अडकले. अशा कामगारांना गावी जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होऊ लागली. अखेर या कामगारांना व मजुरांना गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पनवेल परिसरात एक लाख ७५ हजार स्थलांतरित मजूर अडकल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्या-त्या राज्यात पाठविण्यात येणार असल्याचे नवले यांनी सांगितले. याकरिता प्रक्रिया तयार करण्याचे काम सुरू आहे. जे परप्रांतीय मजूर कामगार आपल्या मूळ गावी जाऊ इच्छितात, अशांना आपली माहिती देण्यासाठी एक फॉर्म पालिका तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला आहे. हा फॉर्म भरून प्रभाग अधिकारी अथवा तलाठ्यांकडे देण्याच्या सूचना कामगारांना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून याकरिता अॅपदेखील विकसित करण्यात आले आहे. यात कामगारांची माहिती भरली जाणार आहे. विशेष परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना राज्यात परत आणणार आहेत. अॅपवर कामगारांनी आपली माहिती भरल्यानंतर संबंधित परराज्यातील प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालय समन्वय साधणार आहे.
>कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत, अशा ठिकाणाहून कामगार तसेच मजूरवर्गाला स्थलांतरित करता येणार नाही. प्राथमिक सर्व्हेत पनवेल परिसरात एक लाख ७५ हजार स्थलांतरित कामगार व मजूरवर्ग आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना मूळ गावी पाठविण्यात येणार आहे.
- दत्तात्रेय नवले,
प्रांत अधिकारी, पनवेल